नाशिक : शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत याचा अभिमान : पालकमंत्री दादा भुसे | पुढारी

नाशिक : शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत याचा अभिमान : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत येतात, हे बघून अभिमान वाटतो. मात्र, प्रशासकीय पद हे शोभेचे नसून, त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी ना. भुसे बोलत होते. यावेळी नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सत्कारार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केल्याने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ना. भुसे बोलत होते. हे यश अंतिम नसून आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत प्रामाणिकपणे यशाला गवसणी घालत राहावी लागते, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत येतात. याचा सर्वाधिक आनंद मला आहे. कारण शेतकऱ्यांचा संघर्ष मी बघत आलोय. आयुष्यात कायम कष्ट सुरू ठेवा. जनतेसाठी वाहून घ्या. तुमच्या कार्याच्या कौतुकाने तुमच्या पालकांना अभिमान वाटेल असे काम करा. भविष्यात काम करण्याची चांगली संधी आली आहे. त्याचा फायदा जनतेला करून द्या तसेच आयुष्यात आपल्या चारित्र्यावर डाग लागणार नाही. यासाठी प्रयत्नशील राहून प्रामाणिकपणा जपा असे आवाहनही ना. भुसे यांनी केले.

समाजात काम करत असताना आपल्याकडे एखादी व्यक्ती काम घेऊन येते, त्यावेळी त्यांना गरजू समजू नका. त्यांच्या जागी आपण स्वत:ला ठेवून काम करा. ते काम केल्याचे समाधान तुम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा देईल असेही ना. भुसे म्हणाले. ठरवलेल्या कामाच्या चौकटीतून बाहेर पडा. आपल्या कामाचे वेगळेपण सिद्ध करा. आपल्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा वापर समाजाला होण्यासाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहन यावेळी पालकमंत्री भुसे यांनी केले.

यांचा झाला सत्कार

तेजस्विनी आहेर, ऋतुजा पाटील, अक्षय पगार, जयेश देवरे, गौरव सोनवणे, पूनम अहिरे, तृप्ती खैरनार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button