

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा ते देहू रोड यादरम्यानच्या महामार्गाचे चारपदरी काम सन 2010 मध्ये सुरू केले होते. ते काम मार्च 2013 मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. या कामाला तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली असून, अजूनही काम अपूर्णच असल्याने पुणे-सातारा महामार्गाचे तीन तेरा वाजल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
सन 2010 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स इंफ्रा या ठेकेदारास पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम दिले होते. त्याची मुदत 31 मार्च 2013 अशी तीन वर्षांची होती. परंतु, त्यानंतरही राष्ट्रूय महामार्ग प्राधिकरणाने तीन-चारवेळा मुदत वाढवून दिली. त्यामुळे तीन वर्षांऐवजी 13 वर्षे झाली, तरीही यादरम्यानच्या रस्त्याची कामे अपूर्णच आहेत. खेड शिवापूर, किकवी, हरिश्चंद्री अशा ठिकाणांच्या उड्डाणपुलाची कामे अजूनही सुरू केली नाहीत. सेवा रस्त्यांची अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत तसेच पथदिवे, ड्रेनेजलाइन, अशी एक ना अनेक कामे अपूर्णच असूनही टोलवसुली सुरूच आहे. हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न प्रवाशांकडून ऐकायला मिळत आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
स्वच्छतागृह देखील बंदच
पुण्याकडून सातारकडे जाताना खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वच्छतागृह बांधले आहे. मात्र, ते सुरू करण्यासाठी आजपर्यंत मुहूर्तच सापडला नाही. यामुळे प्रवाशांची विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोलवसुली करीत आहे आणि दुसरीकडे प्रवाशांना सुविधा देण्यात कुचराई करीत असल्याने प्रवासी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.