नाशिक : लालपरीच्या सवलतीमुळे खासगी वाहतुकदारांवर परिणाम | पुढारी

नाशिक : लालपरीच्या सवलतीमुळे खासगी वाहतुकदारांवर परिणाम

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्‍या महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत जाहीर केली. या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होऊन महिला प्रवाशांची एस.टी. बसमध्ये गर्दी वाढत असताना खासगी प्रवाशी वाहतूकदारांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सवलत योजनेमुळे अ‍ॅटो रिक्षा, काळी-पिवळी जीप, मेक्सिकॅब या खासगी प्रवासी वाहतुकदारांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

नियमित बस धावणार्‍या मार्गावरील खासगी वाहतुकदारांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. प्रवासी मिळत नसल्याने या चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचे बोलले जात आहे. आर्थिक नियोजन कोडमडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या चालकांना समावत आहे. देवळा – सटाणा मार्गावर तुरळक रिक्षा मोजकेच प्रवासी घेऊन जाताना सद्या दिसतात. अ‍ॅपेरिक्षा चालक तासन्तास प्रवाशांची वाट पाहत असतात. कधी-कधी तर दोन-तीन प्रवाशांवरच पुढे प्रवासी मिळतील या आशेवर त्यांना फेरीला निघावे लागते. मात्र, प्रत्येकवेळी प्रवासी मिळतातच असे होत नाही. यामुळे डिझेलखर्च सुद्धा निघत नाही. ज्येष्ठ महिलांना 100 टक्के तर इतर सर्व महिलांना 50 टक्के बस प्रवास भाड्यात सूट मिळत असल्याने त्या बसलाच प्राधान्य देतात. ज्या मार्गावर बस कमी आहेत, त्याच ग्रामीण भागात खासगी प्रवासी वाहतूकदारांना या निर्णयाचा फटका बसलेला नाही. शासनाने आपली राजकीय पाठ जरी थोपटली असली तरी या खासगी वाहनधारकांचाही विचार करावा, अशी मागणी होत आहे.

शासनाने पहिले ज्येष्ठांना सवलत दिली. आता महिलांनाही प्रवासात 50 टक्के सवलत देऊन आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणली आहे. माझ्यासारख्या शेकडो चालकांच्या कुंटुबाचा उदरनिर्वाह वाहनांवर चालतो. सरकारने याप्रश्नी विचार करायला हवा.
– युवराज खैरनार, रिक्षाचालक, लोहोणेर.

हेही वाचा:

Back to top button