श्रीगोंदा : तुम्हाला कुबड्यांची काय गरज : माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार | पुढारी

श्रीगोंदा : तुम्हाला कुबड्यांची काय गरज : माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा : जिल्हा काँगेसची तिन्ही पदे श्रीगोंदा तालुक्यात असताना बाजार समिती निवडणुकीत काँगेस भाजपसोबत जाणार असेल, तर अजून काँगेसचे कोणते पद दिल्यावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे या निवडणुकीत स्वतंत्रपणे पॅनेल उभा करतील. काँगेसने सगळी पदे तालुक्यात दिली असताना तुम्हाला कुबड्यांची गरज काय? तुमच्यात हिंमत असेल तर स्वतंत्र पॅनेल उभा करून दाखवा, असे आव्हान काँगेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिले. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार दैनिक ‘पुढारी’शी बोलत होते.

शेलार म्हणाले, बाजार समिती निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली आहे. रोज नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. राष्ट्रीय पक्ष असणार्‍या काँगेसने तालुक्यात तिन्ही जिल्हाध्यक्षपदे तालुक्यात दिली. मागील आठवड्यात राजेंद्र नागवडे यांच्या रुपाने एक मोठे नेतृत्व काँगेसला लाभले आहे. एवढी मोठी पदे तालुक्यात असताना काँगेस भाजप सोबत जाणार असेल तर काँगेसला नक्कीच आत्मचिंतन करावे लागणार आहे.

ही सहकारी संस्थेची निवडणूक आहे. आघाडी करण्यात काहीच गैर नाही, मग नागवडे कारखाना निवडणुकीत नागवडे गट आणि पाचपुते गट एकत्र का आले नाहीत, असा सवालही शेलार यांनी केला. खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत कुणी काय काय केलं हे सगळं आमच्या जमेला आहे. समोरच्याला गद्दार म्हणन्या अगोदर सोसायटी मतदारसंघातील 22 मतदारानी फक्त दोनच उमेदवारांना कुणाच्या सांगण्यावरून मतदान केले हे आम्हाला सांगायला लावू नका, असा इशाराही शेलारांनी दिला.

एकदा घरगुती मेळ घाला
ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यावर निशाणा साधताना अण्णासाहेब शेलार म्हणाले, बाबासाहेब भोस स्वतःला राष्ट्रवादीचे नेते म्हणवतात. मुलगा नगरपालिकेत शिंदे गटाचा गटनेता. सुनबाईना जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची उमेदवारी. तुमच्या घरात तरी ताळमेळ आहे का?

निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल करा
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर रविवारी काँगेसने तहसीलसमोर निदर्शने केली. अन् लगेच दुपारी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. हीच का तुमची पक्षनिष्ठा, तालुक्यातील काँगेसच्या नेत्यांचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे. हे यानिमित्ताने सिद्ध होते. तुमच्यात हिंमत असेल तर बाजार समिती निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल तयार करा.

Back to top button