वाळकी : ‘अविश्वास’ रद्द होण्यासाठी दोन सदस्यांचे अपहरण | पुढारी

वाळकी : ‘अविश्वास’ रद्द होण्यासाठी दोन सदस्यांचे अपहरण

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील इसळकच्या महिला सरपंचावरील दाखल अविश्वास ठराव रद्द व्हावा म्हणून दोन ग्रामपंचायत सदस्यांचे सरपंचाच्या पतीसह सहा ते आठ जणांनी अपहरण केले होते. ही घटा तालुक्यातील चास शिवारात घडली. याप्रकरणी महिला सरपंचासह त्यांचे पती, मुलगा व इतर पाच, अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी सरपंचाच्या पतीला अटक केली आहे. नगर तालुक्यातील इसळकच्या महिला सरपंच छाया संजय गेरंगे यांच्यावर विरोध सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावाबाबत मंगळवारी (दि.28) ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

हा अविश्वास ठराव रद्द व्हावा म्हणून पती संजय दिवाणजी गेरंगे, नीलेश संजय गेरंगे व इतर पाच अनोळखी व्यक्तींनी ग्रामपंचायत सदस्य विशाल बंडू पवार व संजय राजाराम खामकर यांचे चास गावच्या शिवारातून सोमवारी (दि.27) रात्री एका पांढर्‍या कारमधून व एका काळ्या रंगाच्या एक्सयुव्ही गाड्यांमध्ये बळजबरीने बसवून त्यांचे अपहरण केले होते. याबाबत मंगळवारी (दि.28) सकाळी पोपट आप्पा तांबे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सरपंच छाया गेरंगे यांच्यासह त्यांचे पती, मुलगा व इतर पाच जणावर गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग यांनी सुरू केला. तपासादरम्यान अपहरण केलेल्या दोघा ग्रामपंचायत सदस्यांना रात्रभर गाड्यांमध्ये विविध ठिकाणी फिरवून त्यांना ग्रामपंचायत सभा संपल्यानंतर मंगळवारी (दि.28) दुपारी दोनच्या सुमारास पांढरीपूल परिसरात अपहरणकर्त्यांनी सोडून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.28) रात्री उशिरा महिला सरपंच छाया गेरंगे यांचे पती संजय दिवाणजी गेरंगे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी (दि.29) दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Back to top button