Nashik Crime : दुकानफोडीचे तीन गुन्हे उघड ; दोघांना अटक | पुढारी

Nashik Crime : दुकानफोडीचे तीन गुन्हे उघड ; दोघांना अटक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वडनेरभैरव पोलिसांनी दुकानफोडीच्या तीन गुन्ह्यांमधील दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तिन्ही गुन्ह्यांतील एकूण 82,100/- रुपये किमतीचा कॉपर माल, इलेक्ट्रिक मोटर, कॉपर वायर असा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली 2,00,000/- किमतीची कार असा एकूण 2,82,100/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली.

गेल्या एक ते दीड महिन्यात वडनेरभैरव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडाळीभोई, धोडांबे गावातील विविध इलेक्ट्रिक दुकाने फोडत जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यातील संशयितांची गोपनीय माहिती भामरे यांना सूत्रांकडून मिळाली होती. नाशिकला सापळा रचून प्रभू जगमलाल यादव (वय २५, रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक), मयूर ऊर्फ मन्या चंद्रकांत साळवे (वय २८, रा. नाशिकरोड, जेल रोड) यांना अटक केली, तर तिसरा संशयित अशरफ हमिद शेख (रा. मातेरीवाडी, नाशिक) हा फरार झाला. अटक केलेल्या दोघा संशयितांकडून वडनेरभैरव पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई नाशिकचे ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे व सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, सहायक फौजदार दीपक दोडे, सहायक फौजदार रमेश आवारे, पोलिस नाईक घुमरे, वाघमारे, माळी, कर्डे, पोलिस शिपाई गांगोडे, पिठे यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button