नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा | पुढारी

नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील वाहनचालक पदाच्या १५ जागांसाठी राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मैदानी, वाहन चालवण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर अंतिम लेखी परीक्षा रविवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील भुजबळ नॉलेज सिटीच्या महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेसाठी १२४ पैकी १२२ उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. दोन उमेदवारांच्या गैरहजेरीचे कारण अस्पष्ट आहे. या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडला नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

ग्रामीण पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पाेलिस हवालदार चालक, पोलिस नाईक चालक व पोलिस शिपाई चालक (सेवाप्रवेश) आदी १५ पदे शिपाई भरतीप्रमाणेच भरली जाणार आहे. खुूला (५), अनुसूचित जमाती (३), अनुसूचित जाती (२), ओबीसी (२), इडब्ल्यूएस (२) व भटके विमुक्त प्रवर्गातून एकाची निवड करण्यात येणार आहे. रिक्त जागांसाठी २ हजार ११४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ ते ४ जानेवारीदरम्यान मैदानी परीक्षेसाठी १ हजार २४० उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातून १ हजार २२ उमेदवारांनी वाहन चालवण्याची प्रत्यक्ष चाचणी दिली. या दोन्ही चाचण्यांच्या गुणवत्ता यादीनुसार १२४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. दरम्यान, लेखी परीक्षा शंभर गुणांची घेण्यात आली. परीक्षेत अंकगणित, सामान्य घडामोडी, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालविण्यासह वाहतुकीसंदर्भातचे नियम यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. गुणवत्तेसह सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न सोडविताना उमेदवारांची कसाेटी लागली होती. लेखी परीक्षेनंतर उमेदवारांचे अंतिम निकालाकडे लक्ष लागले आहे.

उत्तरतालिका प्रसिध्द; हरकतीसाठी आज मुदत

१५ पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका रविवारी (दि.२६) दुपारी ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. चारही प्रश्नसंचानुसार योग्य पर्यायांचे अक्षर उत्तरतालिकेत नमूद आहे. दरम्यान, या उत्तरतालिकेबाबत हरकत असल्यास सोमवारी (दि.२७) दुपारी बारा वाजेपर्यंत अधीक्षक कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button