चाकण येथे कांद्याची उच्चांकी आवक | पुढारी

चाकण येथे कांद्याची उच्चांकी आवक

चाकण : पुढारी वृत्तसेवा : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी (दि. 25) कांद्याची उच्चांकी 36 हजार पिशवी म्हणजे 18 हजार क्विंटल आवक झाली. यंदाच्या हंगामातील ही उच्चांकी आवक आहे. कांद्याला 800 ते 1 हजार 211 रुपये एवढा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या दरात यंदा अपेक्षित वाढ होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत व्यापारी आणि कांदा निर्यातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मते राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे उत्पादन अधिक झाले आहे.

तसेच, महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत देशांतर्गत घट झाली आहे. त्याचाही थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर होत आहे. यामुळे कांद्याचे दर यंदा खालीच राहिलेले आहेत. खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. खेड बाजार समितीत कांद्याची मोठी आवक सुरू झाल्यामुळे भावात घसरण झाली आहे. दरम्यान, चाकणमध्ये बटाट्याची 3 हजार पिशवी आवक होऊन त्याला 800 ते 1 हजार 300 रुपये एवढा भाव मिळाला. नवीन गावरान बटाट्याला 800 ते 1 हजार 100 रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

Back to top button