नाशिक (नांदूरशिंगोटे) : प्रकाश शेळके
सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोर्यातील चास येथील तीन तरुण अपघातात मृत्यूमुखी पडल्याची घटना घडल्याने भोजापूर खोरे शोकसागरात बुडाले. तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या होतकरु तरुणांच्या मृत्यूच्या बातमीने अख्खा सिन्नर तालुका हळहळला. गुढीपाडवा सणावरदेखील दु:खाची छाया पसरली आहे.
चास येथील जिगरी मित्रांनी तुळजापूर येथे आई भवानीच्या दर्शनासाठी जाण्याचे नियोजन केले होते. सोमवारी (दि.20) रात्री नऊ मित्र बोलेरो जीपने देवदर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात घडला. अपघाताची बातमी भोजापूर खोर्यात धडकली तसे अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. कुणालाही या बातमीवर विश्वास बसत नव्हता. अपघात आणि तीन तरुणांच्या मृत्यूची बातमी खोटी ठरावी, अशीच प्रार्थना प्रत्येक जण करीत होता. मात्र घडलेली घटना सत्य होती. नियतीने तीनही होतकरु तरुणांवर घाला घातला होता. त्यामुळे गाव सुन्न झाला. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एकूण नऊ जण दर्शनासाठी निघाले होते. मंगळवारी सकाळी आलेल्या बातमीने गाव सुन्न झाला. चास हे बाजारपेठेचे गाव आहे. मात्र अपघातामुळे संपूर्ण गावाने दिवसभर दुखवटा पाळला. एकाही घरात चूल पेटली नाही. व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन संबंधित कुटूंबीयांच्या दु:खात सहभागी झाले. चास गावात बुधवारी आठवडे बाजार असतो. मात्र तोही बंद ठेवण्यात येणार आहे.
सानप कुटुंबात एकुलता एक निखिल
निखिल रामदास सानप हा या अपघातातील मयत झालेला तरुण असून निखिलचे वडील रामदास सानप गेल्या 30 वर्षांपासून फोटोग्राफी व्यवसायात असून काही दिवसापूर्वी त्यांनी लॅण्ड डेव्हलपिंग या क्षेत्रात पदार्पण करून कुटुंबाची घडी बसवली आहे. रामदास सानप यांना निखिल हा एकुलता एक मुलगा होता. निखिलच्या पश्चत दोन बहीणी, आई-वडील असा परिवार आहे. त्याने इंजीनियरिंगपर्यंत शिक्षण पूर्ण केलेतो वडिलांना व्यवसायात हातभार लावत होता.
इंजीनिअरिंगनंतरही अथर्व शेतात लावायचा हातभार
या अपघातातील मयत झालेला दुसरा तरुण अथर्व शशिकांत खैरनार. त्याचे वडील शशिकांत खैरनार हे शेती व्यवसाय सांभाळून मुलांचे शिक्षण करत असून शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यांना दोन मुले असून अथर्व हा बीकॉमला होता तर दुसरा मुलगा पुणे येथे शिक्षण घेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील शेतीवर गुजराण करणारे हे कुटुंब असून आजच्या घडलेल्या अपघातामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
अनिकेतने केले होते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण
या अपघातातील तिसरा मयत अनिकेत बाळासाहेब भाबड. बाळासाहेब भाबड यांना अनिकेत व संकेत अशी दोन मुले असून अनिकेतने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला कामासाठी हातभार लावण्याचे काम करत होता. भाऊ संकेत हा फोटोग्राफी व्यवसाय करत होता. बाळासाहेब भाबड हे भाजीपाला व्यापारी असून त्यांनी आपल्या कुटुंबासाठी व्यवसाय व शेतीची सांगड घातली होती.
अनिकेतला बाबीर देवस्थानहून घेतले सोबत
गेल्या दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील एका गावातून बारामतीजवळच्या बाबीर देवस्थान येथे दिंडी गेली होती. अनिकेत या दिंडीत अगोदरच गेलेला होता. मात्र अन्य मित्रांचे तुळजापूर येथे दर्शनाला जाण्याचे नियोजन झाल्यानंतर त्यांनी अनिकेतशी संपर्क साधला आणि बाबीर देवस्थान येथून त्यालाही सोबत घेतले. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. पुढच्या काही तासातच सोलापूरजवळ वाहनाच्या अपघातात अनिकेतचा मृत्यू झाला.