नगर : पुढारी वृत्तसेवा : डीएड, टीईटी परीक्षेसंदर्भात दोन दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या व्हिडीओ क्लिपप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात वेगवेगळ्या परीक्षासंदर्भात चौकशी सुरू असतानाच, नगर जिल्ह्यातील व्हिडीओ क्लिपने खळबळ उडवून दिली होती. शिक्षण विभागातील एका जबाबदार अधिकार्याकडून सौदेबाजी सुरू असल्याची त्यात दिसते. 'पुढारी'ने दोन दिवस त्यावर प्रकाशझोत टाकल्याने त्याची दखल परिक्षा मंडळास घ्यावी लागली.
आता चौकशीत 'त्या' सिस्टीमचाच पर्दाफाश करण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त दराडे यांनीही गंभीर दखल घेत चौकशी समिती नियुक्त केली आहे. डीएलएड, टीईटी तसेच जेसीसी परीक्षेचा उल्लेख असलेली व्हिडीओ क्लिपमधील संभाषण करणार्या व्यक्ती नगर जिल्ह्यातील व शिक्षण विभागातील असल्याची दाट शक्यता त्यांनी वर्तविली आहे. या क्लिपमधील संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी समिती करणार आहे.
समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भगवान खार्के यांच्यावर जबाबदारी दिली असून, सदस्य म्हणून शिक्षणाधिकारी अशोक कडूस, तर सदस्य सचिव म्हणून शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करावा. तसेच चौकशीत याप्रकरणात तथ्थ आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी, त्याचा अहवाल परीक्षा परिषदेला पाठवावा, असेही नमूद केले आहे.