नगर : …हे तर भेसळीच्या दुधातील हिमनगाचे टोक | पुढारी

नगर : ...हे तर भेसळीच्या दुधातील हिमनगाचे टोक

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यात भेसळयुक्त दुधाचे रॅकेट उघड झाल्यानंतर पोलिस तपासात मंगळवारी (दि.21) आणखी पाच आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यात भेसळयुक्त दूध खरेदी करणारा सतीश ऊर्फ आबा कन्हेरकर व भेसळीसाठी रसायन पुरवणार्‍या शुभम बोडखे यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या अकरा झाली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचा, तसेच सध्या उघड झालेले हे भेसळीच्या दुधावर तरंगणारे हिमनगाचे टोक असल्याचा आणि त्याखाली मोठमोठी नावे दडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाने काष्टी येथे बाळासाहेब पाचपुते याच्या घरी छापा टाकून व्हे पावडर व लाईट लिक्विड पॅराफीनचा साठा जप्त केल्यानंतर दुधात भेसळ करणारी ही टोळी उघडकीस आली. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड संदीप मखरे याला अटक केल्यानंतर त्याचे साथीदार असलेला एकेक आरोपी निष्पन्न होत आहे. मंगळवारी सतीश कन्हेरकर (रा. भानगाव), महेश मखरे (रा.मखरेवाडी), शुभम बोडखे (रा. श्रीगोंदा), समीर शेख (रा. राहुरी), कैलास लाळगे (रा.शिरूर) आरोपी निष्पन्न झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
या आरोपींचा शोध लागल्यानंतरही आणखी बड्या धेंडांची नावे या गुन्ह्यात निष्पन्न होण्याची शक्यता असून, त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

हे दूध खरेदी करणारा आधीच पळाला
श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागात भेसळयुक्त दुधाची निर्मिती करून त्याची कन्हेरकरच्या प्लँटवर विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू होता. दरम्यान, गुन्ह्यात नाव निष्पन्न होण्याआधीच कन्हेरकर पसार झाला आहे. दरम्यान, मंगळवारी अन्य काही प्लँटमधून दुधाचे नमुने तपासण्यात आल्याचे आणि त्यात सोडा, मीठ आढळून आल्याचे समजते.

Back to top button