

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
वणी – सापुतारा महामार्गावर खोरी फाट्यानजीक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील पती, पत्नी व त्यांच्या 4 महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 9) घडली.
विशाल नंदू शेवरे (२४), सायली विशाल शेवरे (२०) व अमृता विशाल शेवरे (4 महिने) अशी मृतांची नावे आहेत. सुरगाण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या बस (क्रमांक एमएच ७ सी ९३४६) चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरात धडकली. त्यामुळे दुचाकी उडून रस्त्यालगतच्या कांद्याच्या शेतात पडली, तर बस झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे बसमधील पाच प्रवासी जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजक असल्याने त्याला नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र धडक जोरदार असल्याने दुचाकीवरील आई-वडीलांसह चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. बसमधील जखमींची नावे मंजुळा एकनाथ वाघमारे, देवीदास तुळशीराम भोये, तारा रमेश कुंभार, रमेश नाया कुंभार, कृष्णा त्र्यंबक गावंडे अशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.