…तर आढळराव यांना महामार्गावरून ये-जा करू देणार नाही : राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर | पुढारी

...तर आढळराव यांना महामार्गावरून ये-जा करू देणार नाही : राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा :  उठसुठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका करण्याचे थांबवले नाही तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना खेड तालुक्यात फिरू देणार नाही. एवढेच काय खेड तालुक्यातुन जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरन ये-जा करू देणार नाही, असा थेट इशारा खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर यांनी दिला.

गेल्या काही महिन्यात मुळ शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांत मोठा तणाव आहे. अशातच आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करण्याचे प्रयत्न झाल्यास तालुक्यात मोठा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाकळवाडी (ता. खेड) येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या प्रयत्नांतून साडेतीन लाख रुपयांचे पत्रा शेड (सभामंडप) मंजूर करण्यात आले. सन २०२०-२१ मध्ये मंजुरी असलेल्या या कामाचे ठेकेदाराने दीड वर्षांपूर्वी पैसे काढुन घेतले, असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्याची माहिती घेण्यासाठी माजी खासदार आढळराव पाटील यांनी रविवारी (दि. ५) वाकळवाडी येथे भेट दिली. त्यावेळी वस्तुस्थिती पाहता हा निधी हडप केल्याची खळबळजनक बाब समोर आली. त्यावरून आढळराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पानसरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका केली.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष पानसरे यांनी ६५ टक्के कामात अपुर्णता असताना कामांची रक्कम अदा केल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. ९) पत्रकार परिषद घेऊन आढळराव पाटील यांना टार्गेट करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पानसरे यांच्यासह जिल्हा दुध संघाचे संचालक अरुण चांभारे, ॲड. सुखदेव पानसरे, वरुडेचे सरपंच मारुती थिटे उपस्थित होते.

कैलासराव सांडभोर यावेळी म्हणाले, राष्ट्रवादी विरोधात बोलल्याशिवाय आढळराव यांचा दिवस जात नाही. खासदार असताना १५ वर्षात त्यांनी कोणतेही काम केले नाही. आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची कामे झाली. खेड तालुक्यातील प्रशासकीय इमारतीला विरोध केला. विमानतळ, कंपन्याना विरोध करून युवकांचा रोजगार बुडवला. दुसऱ्याने केलेल्या विकासकामांत चुका शोधण्याशिवाय त्यांच्याकडे काम नसल्याचा आरोप सांडभोर यांनी केला.

 

नागरिकांच्या मागणीनुसार वाकळवाडीत काम मंजुर केले. प्रशासकीय कार्यवाहीत काही चुका असतील तर त्यात दोषींवर कारवाई करावी. मात्र त्या चुकीचे खापर माझ्यावर फोडून आढळराव एका महिलेचा अवमान करीत आहेत. विकासकामात कोणत्याही चुकीच्या पद्धतीला पाठिशी घालत नाही. एक वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासक आहे. आढळरावांची टीका अशोभनीय आहे.

                                        – निर्मलाताई पानसरे, माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद पुणे

Back to top button