काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या सोयी सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

डॉ. विजय कुमार गावित,www.pudhari.news
डॉ. विजय कुमार गावित,www.pudhari.news
Published on
Updated on

नंदुरबार : सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे साडेबाराशे वर्षांची परंपरा असलेली काठी संस्थानची होळी पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करून साजरी केली जाते. परिसरातील लाखो आदिवासी बांधवांसाठी हा एक महत्त्वाचा क्षण असतो. पुढील वर्षापासून या राजवाडी होळीचे पर्यटनदृष्ट्या ब्रॅंडिंग तसेच होळीसाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते काठी (ता. अक्कलकुवा) येथे प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे सदस्य सी.के.पाडवी, माजी जि.प.अध्यक्षा कुमूदिनी गावित, किरसिंग पाडवी, नागेश पाडवी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, रात्रभर पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधव समुह नृत्य करून आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. काठीला जाणाऱ्या रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी होते. रस्त्याच्या दुतर्फा जाणारे अनेक समूह काठीच्या दिशेने जात असतानाही समृह नृत्य करतात. होळीच्या काळात आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा आहे. या काळात नवस फेडणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्न ग्रहण करीत नाही.,खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही. पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. होळी प्रज्वलित होईपर्यंत त्यांचे नाचणे व गाणे ही दिनचर्या सुरू असते.

ते पुढे म्हणाले, आदिवासी बांधवांना होलिकोत्सवासाठी विविध वस्तूंची आवश्यकता असते. या वस्तूंची खरेदी करण्यासाठी होळी उत्सवाच्या आठवडाभर आधी परिसरात जो बाजार भरतो. त्याला भोंगऱ्या बाजार असे म्हटले जाते. या बाजारात होलिकोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंबरोबरच चांदीच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच घरासाठी लागणारी इतर सामग्री खरेदी केली जाते. उत्सव भोंगऱ्या बाजारापासून सुरू होतो तो रंगपंचमीला संपतो.

जिल्ह्यात सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार धडगाव व फलई इथं भरतो. इथला भोंगऱ्या बाजार प्रसिद्ध आहे. या बाजाराला महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थानमधले अडीच-तीन लाख लोक येतात. या कालावधीमध्ये परस्परांच्या घरी जाणे, नवस फेडणे, नातेवाईकांच्या भेटी होत असतात, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण राजवाडी होळी

घुंगरू, टोप, ढोलकी, मोठा ढोल, मोरपिसांची बासरी, शस्त्र असा पारंपरिक साज परिधान केलेले आदिवासी समुह रात्रभर एकाच तालावर ढोल, बिरी, पावा, घुंगरुच्या सुमधुर आवाजात तालबद्ध पद्धतीने होळीच्या चुहूबाजूंनी फेर धरून, जोरकस गिरक्या घेत पारंपरिक नृत्य करतात. साऱ्या वाद्यांचा आवाजात संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण करणारी नृत्य मंत्रमुग्ध करतात. यावेळी आदिवासी बांधवांच्या हातात धाऱ्या, तिरकामठे, कुऱ्हाड, बर्ची (शस्त्र) असतात. तसेच चेहऱ्यावर विविध प्राण्यांचे मुखवटे लावतात. हातामध्ये ढोल, पिपरी, पावरी,बासरी आदी वाद्यांनी परिसर दुमदुमून जातो. पहाटेच्या वेळी प्रज्वलित होणारी होळी आणि तेथे जमलेले नागरिक, एका सुरातालात होत असलेले नृत्य या सर्व बाबी विहंगम दिसतात. तो क्षण डोळ्यात साठवणे हा एक विलक्षण अनुभव असतो. असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news