हिंदू मंदिरांच्या इनामी, वक्फच्या जमिनी पुन्हा मूळ मालकांच्या नावे होणार : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

हिंदू मंदिरांच्या इनामी, वक्फच्या जमिनी पुन्हा मूळ मालकांच्या नावे होणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील हिंदू मंदिरांच्या इनामी जमिनी तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनी बेकायदेशीररीत्या विकल्या गेल्या आहेत, त्या पुन्हा त्यांच्या मूळ मालकांच्या नावावर करण्याचे आदेश दिले जातील आणि याबाबतच्या गुन्ह्याचा तपास तातडीने केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

राज्यात हिंदू मंदिरांच्या इनामी जमिनी बेकायदेशीररीत्या परस्पर विकल्या जात आहेत. याबाबत तक्रारी केल्या, तरी त्याची अधिकारी दखल घेत नाहीत. तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीही बेकायदेशीररीत्या विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकरणांत राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. सदर प्रश्न हा राज्यभर आहे, त्यामुळे सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

चार महिन्यांत अहवाल घेणार

इनामी जमिनी तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनी बेकायदेशीररीत्या विकल्या गेल्या आहेत, त्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासाचा प्राथमिक अहवाल चार महिन्यांत प्राप्त करून घेऊ, काही सरकारी अधिकारी यात सामील आहेत, अशी माहिती पुढे आली आहे, यात सामील असलेल्यांची नावे जाहीर केली जातील, असे फडणवीस यांनी सांगितले. याबाबत नवीन कायदाही विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनापर्यंत आणला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

देवस्थान किंवा व्यक्तींच्या नावे होणार जमीन

पूर्वीच्या काळात देवस्थानच्या जमिनी इनामाने दिल्या जात होत्या. त्यामूळ मालकाच्या नावावर करण्यात येणार आहेत. काही जमिनी थेट देवस्थानांच्या नावावर आहेत, तर काही व्यक्तींच्या नावावर आहेत. या जमिनी बेकायदेशीररीत्या विकल्या असतील, तर मूळ जे देवस्थान किंवा व्यक्तींच्या नावे होत्या; त्यांच्याच नावावर केल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Back to top button