पुणे : राज्यात यंदा हरभरा उत्पादन येणार बंपर; 29 लाख हेक्टरवर पेरणी | पुढारी

पुणे : राज्यात यंदा हरभरा उत्पादन येणार बंपर; 29 लाख हेक्टरवर पेरणी

किशोर बरकाले

पुणे : राज्यात सद्य:स्थितीत 29 लाख 20 हजार 56 हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली असून आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे उच्चांकी 36 लाख टनांहून अधिक हरभर्‍याचे बंपर उत्पादन हाती येण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज असून हरभरा साठवणुकीची समस्याही निर्माण होऊ शकते.

त्यामुळे किमान आधारभूत किमतीने हरभर्‍याची खरेदी केंद्रे वेळेत सुरू करण्याची आवश्यकता असून तसे न झाल्यास कांद्यानंतर हरभर्‍याच्या दरात घसरणीची दाट शक्यता आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीने पाणी उपलब्धता अधिक आहे. पाऊस दीर्घकाळ लांबल्याने ज्वारीचा पेरा अपेक्षेपेक्षा घटला आहे.

त्यामुळे गहू आणि हरभरा पेरणी वाढण्याचा अंदाज रब्बी हंगामाच्या सुरुवाती पासूनच वर्तविण्यात येत होता. ऊस पीक निघाल्यानंतरही हरभरा पेरणीस प्राधान्य देण्यात आले. राज्यातील हरभर्‍याचे सरासरी क्षेत्र 21 लाख 58 हजार 270 हेक्टरइतके आहे. त्यामुळे हरभर्‍याची 29.20 लाख हेक्टरवरील पेरणीचा विचार पाहता सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे 135 टक्क्यांवर हरभर्‍याची पेरणी झालेली आहे.

Back to top button