धुळे : दुर्गम भागात कारवाई करत ४ लाखांचा गांजा जप्त | पुढारी

धुळे : दुर्गम भागात कारवाई करत ४ लाखांचा गांजा जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 4 लाख 14 हजार रुपये किमतीच्या गांजाची रोपे नष्ट करण्यात आली. यावेळी ४ लाखाचा गांजा जप्त करण्यात आला. अतिदुर्गम भागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यासह 13 कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांसह 18 कर्मचारी तसेच शिघ्र कृती दलाच्या 10 जवानांची मदत घेण्यात आली. ४ लाखांचा गांजा जप्त केल्‍याने गांजा तस्‍करीला हादरा बसला आहे.

वन विभागाच्या शेतांमध्ये गांजाची लागवड

शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमेलगत वन विभागाच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड झाल्याच्या घटना यापुर्वीही घडल्‍या आहेत. ही कारवाई पहाता पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह शिरपूर तालुका पोलिसांना या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या भागात खबरी मार्फत माहिती गोळा करण्याचे काम सुरु होते. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत तसेच सांगवीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना वन विभागाच्या जागेत गांजाची शेती असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार मोठा पोलिस कर्मचारी वर्ग घेवून या भागात कारवाई करण्यात आली. यावेळी या भागात मुसळधार पाऊस सुरु होता. या शेतापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसताना या पथकाने संकटांवर मात करीत शेतातील गांजाचे पिक उध्दवस्त केले. यात चार लाख 14 हजार रुपये किमतीचा 207 किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्राथमिक चौकशीत ही शेती उदय बुधा पावरा यांनी केल्याची माहिती मिळाल्याने सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button