किसनवीरही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली : अजित पवार | पुढारी

किसनवीरही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली : अजित पवार

खटाव / वडूज ; पुढारी वृत्तसेवा : किसनवीर कारखान्याची आज काय अवस्था आहे? ते पण वरून म्हणत असतील की कशाला माझं नाव दिलं आणि कारखान्याची वाट लावली. अरे जेव्हा मोठ्या लोकांची नावे संस्थांना देता तेव्हा त्यांच्या नावाला साजेसे काम तुम्हाला करता आले पाहिजे. नाव अगदी मोठे प्रतापगड आहे; पण त्याही कारखान्याची काय अवस्था झालीय? ज्यांच्यात धमक आहे त्यांनी कारखाने घेऊन चालवून दाखवावेत. विनाकारण काम करणार्‍यांची बदनामी करत बसू नका, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटाव येथे केली. जिल्हा बँक निवडणुकीचे निर्णय जिल्ह्यातील स्थानिक नेतेच घेतील, अशी ग्वाहीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खटाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सभापती ना. रामराजे नाईक- निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रभाकर देशमुख, सुनील माने, मानसिंग जगदाळे, इंदिरा घार्गे, तेजस शिंदे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, सभापती जयश्री कदम, सुनिता कचरे, सुरेंद्र गुदगे, प्रा. अर्जुन खाडे, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ, कल्पना खाडे, बाळासाहेब जाधव, जितेंद्र पवार, सागर साळुंखे, राष्ट्रवादी आणि पिंपळेश्वर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ना. अजित पवार पुढे म्हणाले, एखादया निवडणुकीत जनतेने एकदा निवडून दिले तर काम करावे लागते तेव्हा जनता दुसर्‍यांदा निवडून देते. कोरोना काळात आम्ही विकासकामे थांबली तरी चालतील पण माणसांचा जीव वाचला पाहिजे, अशी भूमिका घेत पहिल्या व दुसर्‍या लाटेविरुद्ध लढलो.

गरजेच्या सर्व खबरदार्‍या घेतल्या. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे खटावच्या वैभवात भर पडली असून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्यावत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यांना चांगला स्टाफ मिळावा याकडे देखील लक्ष्य देत आहोत.

यापुढच्या काळात सातारच्या नागरिकांना उपचारासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी प्रयत्न करणार आहोत. जिहे कटापूर योजनेला मान्यता ही आमच्याच काळात मिळाली असून अंतिम टप्यातील काम देखील आमच्याच काळात पूर्ण होत आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील रस्त्यावरील सर्व खड्डे मुजवून घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

जिल्हा बँकेला राज्यातील चांगली बँक म्हणून पाहिले जाते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असून शेवटी मतदार ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांना संधी मिळेल. बँक चांगली चालवण्यासाठी ती चांगल्या लोकांच्या हाती राहिली पाहिजे. येणार्‍या काळात नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत लोकांच्या मध्ये राहून चांगले काम करणार्‍याला उमेदवारी दिली जाईल, असे अजित पवार म्हणाले.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, सातारा जिल्हा हा परंपरा असणारा जिल्हा असून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे आणि यापुढेही झाले गेले विसरून उभे राहावे.

ना.बाळासाहेब पाटील म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्त्व दीड वर्षात लक्षात आले असून कोरोनो काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रांनी केले आहे.अजित पवारांचे सातारा जिल्ह्यावर कायम प्रेम राहिले असून त्यांनी जिल्ह्याला न्याय दिला आहे.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर शरद पवार, अजित पवार यांनाही दुःख झाले त्यांनी ते जाहीरपणे बोलून पण दाखवले. माझा पराभव का झाला यावर मी बोलणार नाही माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यार्ंवर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्यामध्ये शिवसेना सहभागी असल्याने कोरेगावचे लोकप्रतिनिधी शिवसेनेचे आहेत त्यामुळे बंधने आहेत.

प्रदीप विधाते म्हणाले, खटाव वासियांवर अजित दादांचे कायम प्रेम राहिले असून जेव्हा जेव्हा ते खटावला आले तेव्हा त्यांनी खटावकरांना भरीव निधी दिला. विशेष बाब म्हणून खटाव ला 2 कोटींचा निधी अजित पवारांनी दिला होता.

प्रदीप विधातेंचे कौशल्यपूर्ण नियोजन

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी थेट खटावमध्ये कार्यक्रम दिला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने अजितदादा अनेक वर्षांनंतर खटावमध्ये आले. प्रदीप विधाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात अनेकांनी पक्षप्रवेश केला.

मेळाव्याला तोबा गर्दी जमली होती. वडूजमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विधाते खटावमध्ये कसा कार्यक्रम घेणार याविषयी जिल्ह्यात उत्सुकता होती. मात्र, विधातेंनी अजितदादांच्या डोळ्यांचेही पारणे फेडले. जबरदस्त गर्दी जमवून विधाते यांनी कौशल्यपूर्ण नियोजनाची पोहोचपावतीच दिली.

अजितदादांनीही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाचे तोंडभरून कौतुक केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा निधीही त्यांनी वाढवून दिला. अजितदादा बोलत असताना ‘प्रदिपअण्णा अध्यक्षच व्हायला हवा होता’ अशा प्रतिक्रिया खटावकरांनी व्यक्त केल्या.

Back to top button