नाशिक : कळवण नगरपंचायतीचा 102 कोटींचा अर्थसंकल्प | पुढारी

नाशिक : कळवण नगरपंचायतीचा 102 कोटींचा अर्थसंकल्प

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
कळवण नगर पंचायतीची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 101.14 कोटींच्या अर्थसंकल्पाला व 2.66 लाख रक्कम शिलकीच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी दिली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष लता निकम, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, लेखापाल पंकज गाडेकर उपस्थित होते.

सन 2023-24 या आर्थिक वर्षात नगर पंचायतीला 7.34 कोटी रुपये महसुली उत्पन्न, तर 85.18 कोटी रुपये भांडवली उत्पन्न व मालमत्ता दायित्व 9.39 कोटी रुपये इतके असणार आहे. महसुली, भांडवली व मालमत्ता दायित्व आदी जमा खर्च विचारात घेता, 101.94 कोटींपैकी 101.91 कोटी खर्च होणार असून, 2.66 लाख रक्कम शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या सभेला सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती रत्ना पगार, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती मयूर बहिरम, प्रथम नगराध्यक्ष तथा नगरसेविका सुनीता पगार, नगरसेवक गौरव पगार, राहुल पगार, बाळासाहेब जाधव, मोतीराम पवार, तेजस पगार, चेतन मैद, हर्षाली पगार, ज्योत्स्ना जाधव, ताराबाई आंबेकर उपस्थित होते. दिव्यांग कल्याण निधी 2.5 लाख, महिला बालकल्याण निधी- 2.5 लाख, दुर्बल घटक कल्याण योजना 2.5 लाख, अल्पसंख्याक विकास योजना 2.5 लाख इतका नियोजित महसुली खर्च आहे. सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) नवीन पाणीपुरवठा योजना 10 कोटी, भुयारी गटार योजना 20 कोटी, रमाई आवास योजना 50 लक्ष, आदिवासी विकास योजना 15 कोटी, 15 वा वित्त आयोग 2 कोटी, आमदार स्थानिक विकास निधी 50 लक्ष, खासदार स्थानिक विकास निधी 50 लक्ष रुपये असा नियोजित भांडवली खर्च होणार आहे.

सात कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार
स्वच्छ भारत अभियान 50 लक्ष, स्वच्छ महाराष्ट्र अभियान 50 लक्ष, तर जिल्हास्तर नगरोत्थान, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना, अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास योजना, अग्निशमन बळकटीकरण, अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेमधून जिल्हा योजनेचा 7 कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button