सातारा : पाचगणीलगतचा डोंगर होरपळला; वणव्यात सरपटणारे जीव भक्ष्यस्थानी | पुढारी

सातारा : पाचगणीलगतचा डोंगर होरपळला; वणव्यात सरपटणारे जीव भक्ष्यस्थानी

पाचगणी : पुढारी वृत्तसेवा : पाचगणी या पर्यटन स्थळालगत असणारा डोंगर बुधवारी दुपारी वणव्याच्या अग्निज्वालांनी होरपळला असून हिरवा शालू पांघरलेला डोंगर काळाकुट्ट राखेने भरला आहे. वन विभाग सुस्त असल्याने असंख्य सुक्ष्मजीव या वणव्यात होरपळले.
पाचगणी हे पर्यटन स्थळ सह्याद्रीच्या डोंगर कुशीत वसले आहे. दक्षिणेला डोंगरकड्यातून जावली तालुका सुरू होतो. तर, उत्तर पूर्वेला डोंगर कडा उतरला की, वाई तालुका लागतो. दरवर्षी तिन्ही बाजूंनी वणव्याच्या भडाग्रीने पर्यटन स्थळालगतचा परिसर होरपळून निघतो. त्याचा परिणाम पर्यटनस्थळाच्या हवामानावर नक्कीच होतो.

दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांना पायबंद घातला जात नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिना सुरू झाला की, हे वणवा सत्र सुरूच होते. पसरणी घाटात तसेच मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी वणवा लावू नये, निसर्ग वाचवा असे मोठे फलक जागोजागी दिसतात. मात्र, तरीही वणवे लागतातच. वन विभागाने वणवा लागू नये, यासाठी गावागावांत जनजागृती करण्याची मागणी होत आहे.

पर्यावरणप्रेमींनी जनजागृती करावी

एरवी निसर्ग संपदा वाचवण्याची भाषा करणारे पर्यावरण प्रेमी तसेच निसर्गप्रेमी मात्र, यावेळी गप्प बसतात. तर, वन विभागसुद्धा बघ्याची भूमिका घेत असतो. या वणव्यात अनेक सुक्ष्म जीव होरपळतात. तसेच गवतातील सरपटणारे लहान प्राणी, झाडांवर घरटे करून राहणारे पक्षी यांचा मात्र नाहक बळी जात आहे. याला जबाबदार कोण? उन्हाळ्यात याच पक्ष्यांकरिता पाणवठे बांधले जातात. मग, वणवे लावून त्यांनाच आपण आगीच्या भक्ष्यस्थानी का ढकलतो? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Back to top button