नगर : कुकडीचे उन्हाळी आवर्तन 5 मार्चला | पुढारी

नगर : कुकडीचे उन्हाळी आवर्तन 5 मार्चला

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : काही महिन्यांपूर्वी पुण्यात पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांनी बैठकीत मतदारसंघातील कुकडी प्रकल्पाचे आवर्तन योग्य वेळेत आणि उच्च दाबाने सोडण्याबाबत, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणार्‍या शेतीला नदीतून पाणी मिळण्याबाबत मंत्र्यांसोबत चर्चा केली होती. शेतकर्‍यांना गरजेच्या वेळी कुकडीचे आवर्तन येत्या 5 मार्चला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

मतदारसंघातील कर्जत तालुक्यातून कुकडी डावा कालवा जातो. त्याचा तालुक्यातील एकूण 54 गावांना शेतीसाठी उपयोग होतो. पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास ते जळून शेतकर्‍यांचे नुकसान होऊ शकते. सध्या या पिकांना पाण्याची गरज आहे. आता, शेतकर्‍यांना याचा नक्की फायदा होईल. आमदार पवारांनी कुकडी बांधकाम वितरण विभागाची कोळेवाडीत शेतकरी आणि अधिकार्‍यांसोबत पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली होती.

या बैठकीत शेतकर्‍यांनी केलेल्या मागणीनुसार तारखा निश्चित या मंत्र्यांकडे पाठविल्या. या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी हिताचा निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती बैठकीत केली होती. त्यानुसार सकारात्मक निर्णय शासनाकडून घेण्यात आला. गेल्या वर्षी कमी पाणी असतानाही चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न केला होता. यंदा पाणीसाठा चांगला असल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने यंदाचे नियोजन होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

Back to top button