नंदुरबार जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन; ३९ जणांना अटक | पुढारी

नंदुरबार जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन; ३९ जणांना अटक

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, कॉम्बिंग, नाकाबंदी सुरु करण्यात येऊन आतापर्यंत एकूण 39 आरोपी अटक व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहेत.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूक-2021 व नवरात्रोत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणुका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. 2 ऑक्टोबर 2021 च्या रात्री बैठक घेण्यात आली.

पोलिस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविण्याबाबत नियोजन केले. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलिस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी, हिस्ट्रीशिटर्स, गैंग हिस्ट्रीशिटर्स, अवैध शस्त्रे बाळगणारे, रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले, चोरीच्या वस्तू बाळगणारे रात्रौ संशयीतरीत्या फिरणारे, कारागृहातून सुटुन आलेले आरोपी, स्टँडिंग वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंट, बेलेबल वॉरंटमधील आरोपींचा शोध घेवून जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.

उप विभागीय पोलिस अधिकारी, अक्कलकुवा एस. एस. सावंत, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करून कारवाई करीत होते. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात 23 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान 113 वाहनांची तपासणी करण्यात येवून 27 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉनवेलेबल वॉरंटपैकी 70 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करुन एकूण 37 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यात 11 आरोपी मयत झालेले होते. त्यांचा निश्चीत ठावठिकाणा व नातेवाईक माहिती नसल्यामुळे न्यायालयाकडून त्यांचेविरुध्द् नेहमी वॉरंट काढण्यात येत होते, अशा मयत आरोपींचे नातेवाईक शोधून त्यांचे मयताचे दाखले प्राप्त केले. तसेच 12 आरोपींनी न्यायालयात दंड भरून वॉरंट रद्द केल्याचे या तपासात निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे 63 बेलेबल वॉरंटची बजावणी देखील करण्यात आली असून 92 समन्सची बजावणी करण्यात आली. यामध्ये नंदुरबार शहर, शहादा पोलीस ठाण्याचे अधिका-यांनी नॉनबेलेबल वॉरंट बजाविण्यात पुढाकार घेतला.

हेही वाचलत का?

Back to top button