नाशिक : द्राक्ष उत्पादकांची ४९ लाखांची फसवणूक, परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा  | पुढारी

नाशिक : द्राक्ष उत्पादकांची ४९ लाखांची फसवणूक, परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा 

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ४९ लाख 19 हजार 52 रुपयांची द्राक्षे खरेदी करून त्या बदल्यात धनादेश किंवा रोख रक्कम न देता आर्थिक फसवणूक केल्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांत परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालात द्राक्ष उत्पादक गणेश पोपट महाले (वय ४९,रा. हस्ते दुमाला, ता. दिंडोरी) यांचे ७ लाख ६९ हजार ६०० रुपयांचे २०८ क्विंटल, रामदास निरगुडे यांचा सोनाका जातीचा ७ लाख ३ हजार ८५२ रुपयांची २०३ क्विंटल द्राक्षे, रवींद्र ठाकरे यांचे थॉमसन जातीचे ५ लाख ४७ हजारांचे १५२ क्विंटल द्राक्षे, मंगेश घुगे यांची सोनाका जातीची १३८.५७ क्विंटल द्राक्ष किंमत ५ लाख २४ हजार ४००, गोरख जाधव यांची सोनाका जातीची १५७.७० क्विंटल द्राक्षे ६ लाख ४ हजार २०० रुपयांची अशी एकूण ४९ लाख १९ हजार ५२ रुपयांची द्राक्षे महम्मद अहमद अन्वर (रा. सीतामढी, राज्य बिहार, हल्ली मुक्काम माळेफाटा, ता. दिंडोरी) याने खरेदी केली. मात्र, द्राक्ष खरेदीपोटी धनादेश व रोख रक्कमही दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी. बी. उदे करीत आहेत.

पोलिसांकडून दक्षतेचे आवाहन

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी माल विक्री करताना व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्याला माहिती न दिल्यास त्यास माल देऊ नये. व्यापाऱ्याचे ज्या बँकेत खाते आहे, तेथे त्याचे सिबिल रेकॉर्ड तपासावे. त्याचे चेक बाउन्स होण्याचे प्रमाण जास्त असल्यास त्यास कुठल्याही अटी-शर्तीवर माल देऊ नये. व्यापाऱ्याकडून छापील लेटरपॅडवरच नोंदणीकृत पावती घेऊनच त्यावर मालाचे वजन, ठरलेली किंमत, झालेल्या मालाची किंमत, वाहतूकदाराचे नाव, पॅकरचे नाव असा तपशील असल्याशिवाय माल देऊ नये. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आगाऊ रक्कम घ्यावी. ती न देणाऱ्यास माल देऊ नये. मिळालेला चेक लगेच वठवावा. एजंटवर कुठल्याही परिस्थितीत विश्वास न ठेवता प्रत्यक्ष व्यापाऱ्याशी बोलूनच रीतसर व्यवहार करावा. कुठलाही तोंडी व्यवहार करू नये. व्यापाऱ्यास माल देताना कुठल्याही सबबीवर सौदा पावती करावीच, कच्ची पावती घेऊ नये. गेलेल्या मालाचे वजन, ठरलेली किंमत ज्या गाडीने ट्रान्स्फर झाला त्या गाडीचे नंबर, चालकाचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक याची माहिती ठेवलीच पाहिजे.

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास पोलिस ठाणे, पोलिसपाटील, पोलिस नियंत्रण कक्षाशी तत्काळ संपर्क साधावा. द्राक्ष माल ज्या ट्रान्स्पोर्टकडे जाणार आहे. त्याला मालाबाबतची माहिती द्यावी. संबंधित व्यवहारात झालेली सौदा पावती व रोजची खरेदी-विक्री पावती व व्यापाराची माहिती घेऊन पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. व्यापाऱ्याचे खाते असलेल्या बँकेला तत्काळ माहिती द्यावी.

– सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, वणी पोलिस

हेही वाचा : 

Back to top button