कसबा, चिंचवड निकालाची उत्सुकता; ग्रामीण भागात पारांवर चर्चांना उधाण | पुढारी

कसबा, चिंचवड निकालाची उत्सुकता; ग्रामीण भागात पारांवर चर्चांना उधाण

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांत राज्यात सत्ताबदल होताना झालेला नेतृत्व बदल व पक्षीय संघर्ष सर्वज्ञात आहे. याच्या काही दिवसांनंतर जिल्ह्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणूक झाली असून, त्याकडे राज्याचे लक्ष केंद्रित झाले होते. राजकीय उलथापालथ करणार्‍या सर्व घडामोडी ताज्या असताना त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पहिल्यांदा होत असलेल्या कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. निकालाबाबत अंदाज व्यक्त करताना होणार्‍या चर्चांना उधाण आले आहे.

अनपेक्षित राजकीय उलथापालथ होऊन राज्यात सत्ताबदल झाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. राज्यात महाविकास आघाडी खिळखिळी करण्यासाठी भाजपने शिंदे गटाला साथ दिली. या पोटनिवडणुकीत केंद्रीय तसेच राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते प्रचारात सहभागी झाले.

अनेक भूकंप घडल्यानंतर सध्याचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भविष्यातील वर्चस्व अबाधित ठेवून वाढवण्यासाठी घटक पक्षांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची घडामोड ठरली आहे, त्यामुळे काही मोठे नेते तर पुण्यात तळ ठोकून होते. साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करून झालेल्या या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा कोणत्या पक्षाचा विजय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Back to top button