नाशिक : श्री सुंदरनारायण मंदिरावर दिमाखदार कळस | पुढारी

नाशिक : श्री सुंदरनारायण मंदिरावर दिमाखदार कळस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील श्री सुंदरनारायण मंदिराची अनेक महिन्यांपासून डागडुजी सुरू असून, मंदिरावर मंगळवारी (दि.२८) कळस बसवण्यात आला. आधी ज्या पद्धतीचा कळस होता तसाच कळस बसवण्यात आला असून, मंदिराचे पहिल्या टप्प्यातील कामकाज अंतिम टप्प्यात आहे. नांदेड येथील देगलूर येथून आणलेल्या दगडावर हाताने नक्षीकाम करून मंदिराचे काम केले जात आहे.

पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या नाशिकमधील सुंदरनारायण मंदिराची उभारणी सन १७५६ साली गोदाकाठावरील अहिल्यादेवी होळकर पुलालगत करण्यात आली. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडात असून, कालांतराने दगडांची झीज होत असल्याचे लक्षात आले. राज्य पुरातत्त्व विभागाने या मंदिराला ‘संरक्षित वास्तू’चा दर्जा दिला आहे. मंदिराची पडझड रोखण्यासाठी सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पुरातत्त्व खात्याने हाती घेतले आहे. यासाठी शासनाकडून सुमारे १२.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. मंदिराच्या नुतनीकरणाचे काम पाच वर्षांपासून पुरातत्त्व खात्याने हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात गर्भगृहाच्या बाह्य बाजूच्या नूतनीकरणाचे कामकाज सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या गर्भगृहाचे जुने दगड उतरवून नवीन बसवण्यात आले आहे. गर्भगृह, शिखर दुरुस्तीसह नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर पुढील कामकाज होणार आहे.

…त्यावेळी दहा लाखांचा खर्च 

पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. त्यासाठी १० लाख रुपयांचा खर्च आला. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिरासाठी दगड, चुना, शिसव, नवसागर आदी साहित्याचा वापर करण्यात आला. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाल्याने दगडांचा भुगा होत असल्याचे तसेच मंदिराच्या दगडांमध्ये झाडी येत असल्याने त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव होता.

हेही वाचा : 

Back to top button