

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मॉडेल स्कूल अंतर्गत जिल्ह्यातील शाळेत भौतिक सुविधा करण्यात येत आहेत. या कामात गुणवत्ता नसेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी शिक्षकांना केले. तसेच दि. 15 ते 30 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत शैक्षणिक मेळावे घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शिक्षण परिषदेच्यावतीने सोमवारी ऑनलाईन शिक्षक संवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, डॉ. रमेश होसकोटी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केेंद्रप्रमुख यामध्ये सहभागी झाले होते.
डुडी म्हणाले, मॉडेल स्कूल अंतर्गत सुरू असणारी चळवळीची वाटचाल यशस्वी सुरू आहे. शाळेतील गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविण्यासाठी खातेप्रमुखांचा दौरा सुरू आहे. कार्यशाळेतून मॉडेल स्कूलबाबत सरपंच यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती लोकांना समजून सांगण्यासाठी शंभर टक्के शाळेत शैक्षणिक मेळावे घ्यावेत. शिक्षकांना चांगल्या सुविधा दिल्या तर शिक्षक कसे चांगले काम करू शकतात, हे दाखवून द्या.
ते म्हणाले, त्रयस्थ यंत्रणेकडून घेतलेल्या प्रथमची बेसलाईन चाचणी व मीडलाईन चाचणीमध्ये 15 टक्के वाढ झाली आहे. मार्च महिन्यात पुन्हा चाचणी होणार आहे. यामध्ये तोंडी परीक्षेत 95 टक्के व लेखित 80 टक्के विद्यार्थी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घ्या.
डुडी म्हणाले, अनेक शाळेत भौतिक सुविधांमध्ये गुणवत्तेची कमतरता दिसत आहे. त्यामुळे कामांवर मुख्याध्यापकांनी लक्ष द्यावे. क्रीडांगण करताना माती, संरक्षक भिंत, वर्ग खोल्या बांधकाम, पिण्याचे पाण्याचे नळ यासह इतर गोष्टी निकषानुसार आहेत की नाही, याची खात्री करा. काम निकषानुसार होत नसल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे. डॉ. विमल माने यांनी नास चाचणीची नोंदणी करण्यासाठी व बाल सुरक्षा विषयी माहिती दिली.
मुख्य कार्यकारी डुडी म्हणाले, असर सर्व्हेनुसार शिक्षणात जिल्हा दहाव्या स्थानावरू न क्रमांक चारवर आला आहे. माझी शाळा-आदर्श शाळा, आनंदायी शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा, अशा उपक्रमाची ही कामगिरी आहे. यापुढेही हे उपक्रम प्रभावीपणे राबवावे.