पुणे : महिलांना ‘कनेक्टिंग एनजीओ’चा आधार | पुढारी

पुणे : महिलांना ‘कनेक्टिंग एनजीओ’चा आधार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अमिता (नाव बदलले आहे) हिचे ब्रेकअप झाल्यामुळे तिला नैराश्य आले होते… तिच्या मनात आत्महत्येचाही विचार आला… पण, यातून बाहेर पडायचे तिने ठरविले अन् कनेक्टिंग एनजीओच्या हेल्पलाइनवर संपर्क केला अन् मनमोकळेपणाने तिने संस्थेच्या स्वयंसेवकाला आपल्या समस्येबद्दल सांगितले… अन् स्वयंसेवकाने तिचे म्हणणे ऐकून घेतले अन् यामुळे तिला एक सकारात्मक वाट मिळाली. अमिताप्रमाणे आज 18 ते 50 वयोगटातील अनेक जणी विविध कारणांमुळे नैराश्येत सापडल्या आहेत. अशावेळी त्यांना ऐकून घेणारे कोणीच नसते… त्यांचे म्हणणे ऐकण्याचे काम संस्थेतील स्वयंसेवक करीत आहेत.

सध्या महाविद्यालयीन आणि नोकरदार तरुणींसह विवाहित महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. कुटुंबातील जबाबदार्‍या, नातेसंबंधांतील दुरावा, नात्यातील वादविवाद, ब्रेकअप, घटस्फोट, कुटुंबातील दुय्यम स्थान,अशा विविध कारणांमुळे महिला नैराश्यात जात आहेत; तर ब्रेकअप, वाढती स्पर्धा, नातेसंबंधांतील दुरावा, करिअर अशा कारणांमुळे महाविद्यालयीन आणि नोकरदार युवतींमध्येही नैराश्य येत असून, अशांना मित्र बनून ऐकून घेण्याचे काम स्वयंसेवक करीत आहेत. आज कित्येक महिला-युवती त्यांच्याशी संपर्क साधत मनमोकळेपणाने व्यक्त होत आहेत.

कनेक्टिंग एनजीओच्या स्वयंसेवक शिल्पा तांबे म्हणाल्या की, महिला-युवतींमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. काहींच्या मनात आत्महत्येचाही विचार येतो. अशावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे कोणीच नसते, अशा महिला-युवतींचे म्हणणे आम्ही ऐकून घेतो. त्यांना मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधू देतो. आम्हाला येणार्‍या एकूण दूरध्वनींपैकी त्यातील 30 ते 35 टक्के दूरध्वनी हे महिला-युवतींचे आहेत. त्या आमच्याशी हेल्पलाइनवर संपर्क करतात. आम्ही त्यांचे बोलणे ऐकून घेतो, त्यांना आधार देतो.

जे इतरांशी बोलता येत नाही ते आमच्याशी बोलतात, अगदी मुक्तपणे. मनमोकळेपणाने बोलता येत असल्याने अनेकांना यामुळे भावनिक आधार मिळाला आहे. रोज किमान एक ते दोन दूरध्वनी येतात. आपल्या वेदना आणि दु:ख ते आमच्याकडे व्यक्त करतात. त्यांचे ऐकून घेतल्यावर त्यांचा त्रास कमी होतो आणि ते सकारात्मक विचार करू लागतात. त्यांना एक वाट सापडते. 9922004305 किंवा 9922001122 या हेल्पलाइनशी संवाद साधता येईल.

Back to top button