नाशिक : ३५ टॉवरचे थकीत पावणेतीन कोटी मनपाच्या तिजोरीत | पुढारी

नाशिक : ३५ टॉवरचे थकीत पावणेतीन कोटी मनपाच्या तिजोरीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महसूल वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसह थकीत गाळेधारकांवरही लक्ष केंद्रित केले असून, आता शहरातील विविध भागांत अनेक कंपन्यांकडे टॉवरच्या भाड्यापोटी थकीत असलेली रक्कम जमा करण्यावरही भर दिला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.२४) एटीसी कंपनीच्या ३५ टॉवरचे २ कोटी ७५ लाख रुपये भाडे मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

शहरात विविध ठिकाणी अनेकविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर्स आहेत. या कंपन्यांकडून प्रतिटॉवरकरता किमान १५ हजार इतके दरमहा भाडे महापालिका आकारणी करते. मात्र, एक ते दीड वर्षापासून अनेक कंपन्यांकडे दरमहा भाडे थकीत असल्याने मार्चअखेरपर्यंत अधिकाधिक थकबाकी जमा करून महसूलवृद्धीसाठी मनपाच्या विविध कर आकारणी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरमहा थकबाकी असलेले भाडे वसूल करण्याच्या दृष्टीने सूचना पत्र पाठविले जात आहे. एटीसी कंपनीने शुक्रवारी (दि.२४) पावणेतीन कोटी रुपयांची थकबाकी मनपाच्या तिजोरीत जमा केली आहे. अशा प्रकारे जवळपास ९० ते ९५ मोबाइल कंपन्यांकडे दरमहा भाड्यापोटी जवळपास १८ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने विविध कर विभागाकडून सांगण्यात आले. मार्चअखेरपर्यंत ही थकबाकी जमा करण्याकरिता संबंधित कंपन्यांकडे मनपाने तगादा लावला आहे.

दरमहा भाडे थकबाकी असलेल्या मोबाइल टॉवर कंपनीची माहिती कर विभागाकडून नगररचना विभागालादेखील सादर केली आहे. त्या अनुषंगाने नगररचना विभागाकडूनही यासंदर्भात मोबाइल कंपन्यांना विचारणा केली जात आहे. दरम्यान, शहरातील विविध भागांत जवळपास आठशेहून अधिक मोबाइल कंपन्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांचे मोबाइल टाॅवर अधिकृत नसल्याने ते अधिकृत करण्याबाबतही संबंधित कंपन्यांशी पाठपुरावा नगररचना विभागाकडून केला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button