नगर तालुका : सरकारचा जोर मोठमोठे प्रकल्प दाखवून जाहिरातबाजीवरच : आ. प्राजक्त तनपुरे | पुढारी

नगर तालुका : सरकारचा जोर मोठमोठे प्रकल्प दाखवून जाहिरातबाजीवरच : आ. प्राजक्त तनपुरे

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारचा जोर हा मोठमोठे प्रकल्प दाखवून जाहिरातबाजी करण्यावरच आहे. तसेच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. आगामी सरकार हे आमचेच येणार असल्याचे प्रतिपादन आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. शुक्रवार दि. 24 रोजी इमामपूर तसेच पोखर्डी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आ. तनपुरे यांच्या हस्ते इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, पोखर्डीचे सरपंच रामेश्वर निमसे, रघुनाथ झिने, रोहिदास कर्डिले, विलास काळे, किशोर शिकारे, बाजीराव आवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
तनपुरे म्हणाले, पक्षच फोडून पक्षावर हक्क सांगणे हे चुकीचे आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असून आगामी काळात आमचेच सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भीतीपोटी जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुका घेण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. आम्ही मंजूर केलेली कामे बंद पाडण्याचा धडाका या सरकारने लावला आहे. आमच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन बाहेरील लोक बोलावून केले जात आहे. मतदार संघातील विद्युत उपकेंद्रावरील ओव्हरलोड कमी करण्यासाठी चार सब स्टेशन मंजूर केले आहेत. शंकरराव गडाख मंत्री असताना त्यांच्या मार्फत पाझर तलावासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस खालावत असल्याचेही तनपुरे यांनी सांगितले.

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून 97 लक्ष 83 हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. इमामपूर येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन जलकुंभ व अंतर्गत वितरण व्यवस्था, तलाव दुरुस्ती तसेच पोखर्डी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलकुंभ व अंतर्गत वितरण व्यवस्था व स्थानिक विकास निधी अंतर्गत पोखर्डी ते गालीमखाना रस्ता खडीकरण या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.

इमामपूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने तसेच पोखर्डी येथील अनेक वर्षापासून रेंगाळत असलेल्या रस्त्याचे काम होत असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी किशोर शिकारे, माजी सरपंच गोविंद जरे, सुंदर मोकाटे, डोंगरगण उपसरपंच संतोष पटारे, भास्कर मगर, दत्तात्रय डोकडे, बन्सी वाघमारे, दत्तात्रय म्हस्के, बाबासाहेब जरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समृद्धी महामार्ग हे महत्त्वाचे आहेतच परंतु समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी शेतकर्‍यांना रस्तेच नसतील तर समृद्धी महामार्गाचा उपयोग काय. त्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते बनविणे गरजेचे आहे. शेतकरी आपला शेतीमाल, दूध महामार्गावरून वाहतूक करू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांसाठी जास्त निधी देण्याची गरज आहे.
                                                            – आमदार प्राजक्त तनपुरे

Back to top button