नाशिक : जीवरक्षकांच्या आठ जागांसाठी खासगीकरणातून करणार नेमणूक | पुढारी

नाशिक : जीवरक्षकांच्या आठ जागांसाठी खासगीकरणातून करणार नेमणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या जलतरण तलावांमधील जीवरक्षकांच्या आठ रिक्त जागांवर ४ पुरुष, तर ४ महिला जीवरक्षकांची बाह्ययंत्रणेमार्फत निविदा प्रक्रियेद्वारे अर्थात खासगीकरणातून नियुक्ती करण्यास महासभेने गुरुवारी (दि.२३) मंजुरी दिली. यासाठी ४७ लाखांच्या खर्चाच्या प्रस्तावास महासभेची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून शहरात नाशिकरोड येथे राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, नाशिक पश्चिम विभागात त्र्यंबक रोडवर वीर सावरकर जलतरण तलाव, सिडकोत स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, तर सातपूर विभागात सातपूर जलतरण तलाव उभारण्यात आले आहेत. या तरण तलावांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र पूल आहेत. या जलतरण तलावांमध्ये सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, जलतरणपटू पोहण्यास येत असतात. परंतु दरमहा होणाऱ्या सेवानिवृत्तीमुळे या जलतरण तलावांवरील कर्मचारीवर्ग अपुरा आहे. जलतरण तलावांसाठी महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर जीवरक्षकांची १५ पदे मंजूर आहेत. परंतु त्यापैकी ७ पदांवरच कर्मचारी कार्यरत असून, ८ पदे रिक्त आहेत. तरण तलावांवर पोहण्यासाठी सभासद व नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे जीवितहानी किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवरक्षकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. त्यासाठी चार पुरुष, तर चार महिला अशा आठ जीवरक्षकांची खासगीकरणातून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव गुरुवारी आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दोन वर्षांकरिता बाह्य यंत्रणेमार्फत निविदा प्रक्रियेद्वारे जीवरक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button