डोंबिवली : अनधिकृत बांधकाम प्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

डोंबिवली : अनधिकृत बांधकाम प्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांची चर्चा कायमच रंगलेली दिसते. सध्या डोंबिवली पश्चिम येथील स्मशानभूमीकडे जाण्याच्या रस्त्यावरच एक अनधिकृत इमारत उभी करण्यात आली आहे. दरम्यान ही इमारत परिवहन समितीच्या माजी सभापती असलेल्या एका शिवसैनिकांच्या नातेवाईकांनी बांधली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. डोंबिवलीतील बेकायदा इमारत प्रकरणात विशेष पोलीस तपास पथक, सक्तवसुली संचालनालयाकडून तपास सुरू आहे. या संदर्भात सध्या जवळपास विविध १५ भू-माफियांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या इमारतीचे नाव विठाई हेरिटेज असे असून या भूमाफियाने इमारतीच्या चारही बाजूने वाहन जाण्यासाठीही जागा ठेवली नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाड्या किंवा रुग्णवाहिका जाऊ शकणार नाहीत. या इमारतीत काही बाका प्रसंग घडला तर जबाबदार कोण? असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत. संबंधित इमारती मधील सदनिका भू-माफियांनी विक्रीसाठी सज्ज ठेवल्या आहेत. बनावट कागदपत्र दाखवून घर खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काही जागरुक नागरिकांनी याप्रकरणी पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त यांना या बेकायदा बांधकामाच्या ठिकाणी या इमारतीला पालिकेची परवानगी नाही. याठिकाणी नागरिकांनी सदनिका खरेदी करू नये, असा फलक लावण्याची मागणी केली आहे.

या इमारतीच्या दर्शनी भागातील सज्जाचा भाग रस्त्यावर आला आहे. रस्ता पदपथाची जागा इमारतीसाठी वापरण्यात आली नाही. शून्य सामासिक अंतर ठेऊन (झीरो मार्जिन) ही इमारत उभारण्यात आली आहे, असे तक्रारदाराने सांगितले. या इमारती संदर्भात पालिका नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता, कोपर भागात अशाप्रकारच्या इमारतीला नगररचना विभागाने परवानगी दिलेली नाही. या इमारती मधील सदनिका सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांपासून पुढे विकण्याच्या माफियांच्या हालचाली आहेत असे सुत्राने सांगितले.

हेही वाचंलत का?

Back to top button