Gold Rate : गेल्या दहा दिवसांत सोने ६५० रुपयांनी स्वस्त | पुढारी

Gold Rate : गेल्या दहा दिवसांत सोने ६५० रुपयांनी स्वस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढल्याने, ग्राहकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. सध्या अजूनही सोन्याचे दर कमी झाले नसले तरी, गेल्या दहा दिवसांत ६५० रुपयांनी सोने कमी झाल्याने, ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता, सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅमसाठी ५७ हजारांच्या पार गेल्याने, सोने खरेदी करणे आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपूर्वी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ५७ हजार ४१० रुपये इतका नोंदविला गेला. तर मंगळवारी (दि.२१) हा दर ५६ हजार ७६० रुपये इतका नोंदविला गेल्याने, त्यात ६५० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येते. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १२ फेब्रुवारी रोजी प्रति दहा ग्रॅमसाठी ५२ हजार ६३० रुपये इतका नोंदविला गेला. तर मंगळवारी (दि. २१) ५२ हजार ३० रुपये नोंदविला गेल्याने, त्यात ६०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने सोन्याचे दर वाढत आहेत, त्यात पुढच्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया आणि चीन यांच्याकडून भारत मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करीत असल्यानेही, दर वाढत आहेत. त्याशिवाय जागतिक बाजारात सोन्याचा भाव नवे विक्रम नोंदवित आहे. अमेरिकी डॉलर क्षीण झाल्यामुळेदेखील गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवल्यानेही सोन्याचे दर वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, या स्थितीत फारशी सुधारणा झाली नसल्याने पुढच्या काळात सोन्याचे दर आणखी वाढतील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

चांदी दीड हजारांनी स्वस्त

सोन्याचे दर कमी झाल्यानंतर चांदीही स्वस्त झाली आहे. गेल्या १३ फेब्रुवारी रोजी चांदीचा दर १ किलोसाठी ७० हजार रुपये इतका होता. मंगळवारी मात्र हा दर ६८ हजार ५०० रुपये इतका नोंदविला गेला. सोने-चांदीचे दर कमी होत असले तरी, पुढच्या काळात ते आणखी कमी व्हावेत, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button