पुणे : कारभारणी झाल्या ’मालमत्ता’दार ; मिळकतींवर लागली महिलांची नावे | पुढारी

पुणे : कारभारणी झाल्या ’मालमत्ता’दार ; मिळकतींवर लागली महिलांची नावे

नरेंद्र साठे : 

पुणे : कुटुंबांचा गाडा हाकणार्‍या जिल्ह्यातील आठ लाख कारभारणींच्या नावे मिळकती झाल्या आहेत. कुटुंबातील मालमत्तेत महिलांना समान वाटा मिळण्यास मदत झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना घरांची मालकी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आतापर्यंत नऊ लाख 27 हजार 706 मिळकतींपैकी आठ लाख 15 हजार 573 मिळकतींवर महिलांची नावे लागली आहेत. याकरिता घेतलेल्या फेरफार मोहिमेंतर्गत प्रत्येक गावातील सर्व घरांवर पती-पत्नीची संयुक्त मालकी लावली जात आहे. जिल्ह्यात 1,386 ग्रामपंचायती आहेत.

एकूण गावांची संख्या 1,874 असून, ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या नऊ लाख 96 हजार 212 आहे. एकूण मिळकती नऊ लाख 28 हजार 389 आहेत. आतापर्यंत महिलांच्या मालकी हक्काची नोंद झालेल्या मिळकती आठ लाख 15 हजार 573 आहेत. महिलांचा मालकी हक्क लागलेल्या नोंदीची टक्केवारी 89 टक्के एवढी आहे. ग्रामीण भागात अद्यापही कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुषांचेच वर्चस्व कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील घरांच्या मालकीत महिलांचाही समान वाटा असावा, या प्रमुख उद्देशाने जिल्हा परिषदेने महा फेरफार अभियान सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने 1 डिसेंबर 2021 पासून हे अभियान सुरू आहे. या मोहिमेत सर्व गावे आणि वाड्या-वस्त्यांच्या गावठाणात असलेल्या सर्व मिळकतींच्या सातबारा आणि आठ-अ उतार्‍यावर कुटुंबप्रमुख म्हणून पती व पत्नीचे संयुक्त नाव लावण्यात येत आहे. परिणामी, महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मालमत्तेत मालकी हक्क मिळाला आहे.

अभियानात केलेली कामे
महा फेरफार मोहिमेंतर्गत मृत कुटुंबप्रमुखाची नावे कमी करण्यात आली आहेत. मयताच्या जागी वारसदारांची नोंद करणे, आठ-अ उतार्‍यावर कुटुंबप्रमुख म्हणून पती आणि पत्नीचे संयुक्त नाव लावणे, गावठाणाबाहेर झालेल्या नवीन इमारती किंवा घरांच्या नोंदी करणे, गावठाणातील खरेदी-विक्री झालेल्या मालमत्तेच्या नोंदी अद्ययावत करणे, अशी कामे करण्यात आली.

 

या मोहिमेमुळे मयत व्यक्तींच्या नोंदी कमी करणे, नवीन बांधकामांच्या नोंदी करणे आणि महिलांना मालमत्तेत कायदेशीर हिस्सा मिळविणे आदींसाठी फायदा होणार आहे. तसेच, गावातील मालमत्तांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही समान वाटा असला पाहिजे, या उद्देशाने जिल्हा परिषदेने ही मोहीम सुरू केली आहे.
                           सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

 

Back to top button