पुणे : दहा हजारांची लाच घेताना सहायक आयुक्त जाळ्यात | पुढारी

पुणे : दहा हजारांची लाच घेताना सहायक आयुक्त जाळ्यात

पुणेः पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासन विभागातील एका सहायक आयुक्ताला दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. साहेब एकनाथ देसाई (सहायक आयुक्त वर्ग एक), असे या अधिकार्‍याचे नाव आहे. औंध येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात सोमवारी (दि.20) ही कारवाई झाली. याप्रकरणी, देसाई याच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 54 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिलीे. तक्रारदारांनी त्यांच्या कंपनीमार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी देसाई याने तक्रारदारांकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदारांनी याबाबत 17 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी दुपारी देसाई याला दहा हजार रुपयांची लाच घेताना पथकाने सापळा रचून पकडले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करून मंगळवारी विशेष न्यायालयात हजर केले. या वेळी एसीबीच्या अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे आणि अ‍ॅड. विजयसिंह घोरपडे यांनी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. ज्या कारणासाठी त्याने लाच घेतली, त्याबाबतची कागदपत्रे पुराव्याकामी हस्तगत करायची असल्याने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

Back to top button