पंधरा दिवस अगोदरच या गावात साजरी केली जाते होळी ; असे करणारे देशातील एकमेव गाव

पंधरा दिवस अगोदरच या गावात साजरी केली जाते होळी ; असे करणारे देशातील एकमेव गाव
Published on
Updated on

मढी : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे नगरा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या जयघोषात गडावर होळी पेटविण्यात आली. ग्रामस्थांनी उत्साहात सण साजरा केला. पंधरा दिवस अगोदर होळी साजरी होणारे मढी हे देशातले एकमेव गाव आहे. यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेले हजारो नाथभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. मढी येथील होळीच्या सणाला शेकडो वर्षांची परंपरा असून, स्थानिक बोलीभाषेत याला भट्टीचा सण म्हणतात. नाथांनी समाधी घेतल्यानंतर गावात या सणाला सुरुवात झाली. पौर्णिमेपासून गुढी पाडव्यापर्यंत यात्रा चालते. राज्यातील अठरापगड जातीचे मानकरी व भाविक येण्यास हळूहळू प्रारंभ होतो. मढीचे सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ शेतीवाडी, कौटुंबीक कामे करून यात्रेसाठी सज्ज होतात.

नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पूजा करून मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड व पुजार्‍यांच्या हस्ते रात्री नऊ वाजल्यंनंतर होळी पेटविण्यात आली. यावेळी सरपंच संजय मरकड, देवस्थानचे सचिव विमलताई मरकड,कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, डॉ.विलास मढीकर, शामराव मरकड, भगवान मरकड, नवनाथ मरकड, बी. जे मरकड, एकनाथ मरकड, भानुविलास मरकड आदी उपस्थित होते.

सकाळपासूनच गडावर नाथभक्तांंची गर्दी, तर घरोघरी पाहुण्यांची वर्दळ होती. मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्र मढीच्या भट्टी सणाला उपस्थित होते. या सणासाठी लागणार्‍या गोवर्‍या दहा दिवस अगोदरच कानिफनाथांचे नाव घेत महिलांनी तयार केल्या होत्या. गडावर सकाळ पासून रात्री होळी पेटेपर्यंत अखंड नगारा वाजत होता.

सर्व जाती धर्माच्या महिलांनी घरोघरी तयार केलेल्या गोवर्‍या वाजतगाजत गडावर आणून सूर्यास्तापूर्वी भट्टी रचण्यात आली. साधारण दहा फूट उंच व सुमारे पन्नास बाय पन्नास फूट अशा आकारापर्यत भट्टी रचण्यात आली. गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ग्रामस्थांकडून ठेवण्यात आला.

होळी भोवती आकर्षक रांगोळी व फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती. सर्व समाजातील ग्रामस्थांना होळी रचण्याचा मान असून, नैवेद्यासाठी देवस्थान समितीकडून डाळ व गूळ देण्यात आला होता. धगधगत्या होळीला प्रदक्षिणा घालून देवाला कौल लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. भट्टी पेटल्यानंतर भाविकांनी नाथांच्या भट्टीमध्ये नारळ अर्पण केले.

होळीसाठी लाकडाचा वापर नाही

येथील होळीत लाकूड अजिबात वापरले जात नाही. शुद्ध तूप, कापूर, सुगंधी वनस्पती आदींच्या साहाय्याने होळी प्रज्ज्वलित केली जाते. वृक्षतोड होऊ नये, पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी होळीला शेणाच्या गोवर्‍या थापून त्याला धार्मिक महत्त्व देत सण साजरा केला जातो.

सामाजिक-धार्मिक ऐक्याचे दर्शन
जातीभेद, धर्ममेद बाजूला ठेवत मढी गावाने भट्टीच्या माध्यमातून टिकविलेली प्रथा सामाजिक व धार्मिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडविणारी ठरत आहे. देशात फक्त मढीतच पंधरा दिवस अगोदर होळीचा सण साजरा होतो. सूर्योदयापूर्वी होळी शांत झाल्यावर सर्व राख गोळा करून वर्षभर भाविकांना अंगारा, प्रसाद म्हणून दिली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news