भाजप शिवसेनेला संपवायला निघालीय, स्क्रिप्टनुसारच सगळं घडतय : छगन भुजबळ | पुढारी

भाजप शिवसेनेला संपवायला निघालीय, स्क्रिप्टनुसारच सगळं घडतय : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजपने लिहिलेल्या स्क्रिप्टनुसारच सगळं राजकारण घडत आहे. शिवसेना संपवायला निघाले आहेत. मात्र, राज्यातील सामान्य माणूसही सांगतोय की शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. शेतीच्या बांधावरून वादविवाद व्हावे, त्याप्रमाणे सध्याचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. उद्धव ठाकरे काही राजकारणात नवीन नाहीत. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहेत. त्यामुळे ठाकरे ट्रॅपमध्ये अडकतील, असे अजिबात वाटत नसल्याचे स्पष्टीकरण माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. थोडाफार विश्वास न्यायालयावर आणि चंद्रचूड यांच्यावर आहे. त्यांनी लवकरात लवकर सुनावणी संपविणे गरजेचे आहे. रोज सुनावणी होत आहे. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. पण आता सर्वच ते घेऊन जात आहेत. उद्या मातोश्रीही घेऊन जातील, अशी टिप्पणी करत आता हे थांबायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. शिवसेनेतून आम्ही बाहेर पडलो. काहींनी नवीन पक्ष काढले. पण असे कधी झाले नाही. अजूनही सहानुभूती उद्धव ठाकरे यांनाच आहे. भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे. काहींना ईडीची नोटीस दिली जाते. लोक भाजपकडे गेले की ईडीची कारवाई बंद होते. त्यामुळे हा सर्व मामला एका नियोजित स्क्रिप्टनुसार होत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या सर्व बाबींची कल्पना उद्धव ठाकरे यांना नव्हती, असे काही नाही. त्यांना कल्पना होती, असेही भुजबळ म्हणाले. ठाकरे यांनी काही एका दिवसात भाजप सोडली नाही. १२ आमदार नियुक्ती पत्राबाबत भुजबळ म्हणाले की, १५ दिवसांत आमदार नियुक्तीबाबत आम्हाला कळवा, असे पत्र दिले होते. ती काही धमकी होऊ शकत नाही. आणि जरी तसे असले तरी राग किती दिवस डोक्यात ठेवायचा. सरकार पडेपर्यंत राग डोक्यात ठेवायचा का? असा प्रश्नही भुजबळांनी उपस्थित केला.

पोटनिवडणुकीत मविआचा विजय

पुण्यातील कसबा मतदारसंघासाठी गिरीश बापट यांना आणले गेले. त्यांचा फोटो बघून मला गलबलून आले. मी अनेक वर्षे त्यांच्याबरोबर सभागृहात काम केले आहे. आज ते ज्या परिस्थितीत आहेत त्यांना इन्फेक्शन झाले तर काय, असा प्रश्न करत भाजपला आपला पराभव दिसत असल्यानेच असे उद्योग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेत महाविकास आघाडी विजयी झाली. आताही दोन्ही पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

Back to top button