सोलापूर : मंगळवेढ्यात एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या | पुढारी

सोलापूर : मंगळवेढ्यात एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या

सोलापूर/मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा 

सोलापूर जिल्ह्यात या आठवड्यात खून प्रकरणाची मालिका सुरूच आहे. मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील चार वर्षीय मुलीचा व वाघोली- कोरवली शिवारात औंढीच्या इसमाचे खूनप्रकरण ताजे असतानाच काल (मंगळवार) नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील एकाच कुटुंबातील तीन महिलांच्या हत्याकांडाने मंगळवेढा तालुका हादरला आहे. जिल्हयातील वाढती गुन्हेगारी ही सोलापूर ग्रामीण पोलीस दलासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नंदेश्वर येथील हत्याकांडात दिपाली बाळू माळी (वय २१) पारूबाई बाबुशा माळी (वय ५०) संगीता माळी (वय ४५) अशी खून करण्यात आलेल्या तीन महिलांची नावे आहेत. दरम्यान, हत्याकांड झालेल्या कुटुंबाच्या घराशेजारीच राहत असणाऱ्या समाधान महादेव लोहार (३०) याला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदेश्वर येथील लोहार येथे बाळू माळी हे महादेव कुटुंबीयांसोबत राहतात. मंगळवार, दि. २१ रोजी सकाळी बाळू माळी हे आपल्या आई जयश्री महादेव माळी यांच्यासोबत सांगोला येथे दवाखान्यासाठी गेले होते. दवाखान्याहून दुपारी चार वाजता माघारी आल्यानंतर हा दुर्दैवी प्रकार त्यांच्या लक्षात आला. बाळू याची पत्नी दिपाली ही घरातील धुणे धूत असताना पाठीमागून संशयित आरोपीने डोक्यात दगड घातला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

दिपालीच्या मृतदेहाशेजारी शेतात वापरले जाणारे बेडगे आणि कुदळ पोलिसांना निदर्शनास आले. यानंतर घरात असलेल्या पारूबाई बाबुशा माळी, संगीता माळी या बाळू माळी यांच्या दोन आत्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनाही मारेकऱ्याने अक्षरशः धावत जाऊन मारले असावे, कारण पारूबाई माळी हिचा मृतदेह घराच्या उजव्या बाजूला पडला होता, तर संगीता माळी हिचा मृतदेह घराच्या पाठीमागील बाजूस पडला होता. हा सर्व प्रकार सांगोल्यातून दवाखाना करून घरी आल्यावर पाहिल्यानंतर बाळू आणि तिची आई जयश्री यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.

घरापासून काही अंतरावर असणाऱ्या शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. यानंतर ही बातमी नंदेश्वर गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

नंदेश्वरचे पोलीस पाटील संजय गरंडे यांनी पोलिस स्‍टेशन मध्ये खबर दिल्यानंतर तात्काळ अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक रणजीत माने, सांगोला पोलीस ठाण्याचे अतुल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सत्यजित आवटे, पोलीस उपनिरीक्षक शेटे, पुरुषोत्तम धापटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

माळी कुटुंबीयांच्या घराच्या काही अंतरावर असणाऱ्या समाधान महादेव लोहार याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी समाधान लोहार याच्या घराची झाडाझडती घेतली असता, रक्ताने माखलेले कपडे आणि कुऱ्हाड घरात सापडली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हयातील वाढती गुन्हेगारीमुळे सोलापूर ग्रामीण पोलिस दलासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 

Back to top button