नाशिक मनपावर वंचित’चा झेंडा फडकविण्यासाठी कामास लागा : शिंदे | पुढारी

नाशिक मनपावर वंचित'चा झेंडा फडकविण्यासाठी कामास लागा : शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत मित्र पक्षाच्या सहाय्याने वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवायचाच या उद्देशाने कामाला लागा आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

व्यासपिठावर महासचिव वामन गायकवाड, महानगर महासचिव संजय साबळे, संदीप काकळीज, सातपूर विभागीय अध्यक्ष बजरंग शिंदे, सिडको विभागीय अध्यक्ष अनिल आठवले, मध्य नाशिक विभागीय अध्यक्ष दामू पगारे, नाशिकरोड विभागीय अध्यक्ष महेश भोसले, युवकचे प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड आदीं उपस्थित होते.

नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत आहे. आजही अनेकांनी पक्षात प्रवेश केला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा लोकांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर आपली युती झाली आहे. त्यामुळे या पक्षाच्या सहकार्याने आपणास महापालिकेची सत्ता काबीज करायची आहे अशी खूणगाठ मनाशी कायम बांधा असे निर्देश अविनाश शिंदे यांनी दिले. तसेच प्रदेश महासचिव वामनराव गायकवाड यांनी यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधून प्रभाग रचना, सभासद नोंदणी तसेच निवडणूक सज्जतेचा आढावा घेतला. निवडणुका कोणत्याही क्षणी लागल्या तरी त्याला सामोरे जाण्याची तयारी आहे. शक्यतो निवडणुका स्वबळावरच लढल्या जाव्यात, युतीने लढणार असल्यास जागावाटपात वंचित बहुजन आघाडीच्या पदरात जास्त जागा कशा पडतील यादृष्टीने पावले उचलावीत अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

तुमच्या भावना रास्त असून त्या श्रेष्ठींपर्यंत पोहोचवू असे अविनाश शिंदे आणि वामन गायकवाड यांनी सांगितले. यावेळी संकेत पगारे उर्फ मोनू यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभारांचे नियुक्तीपत्र देण्यात आले. बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

 

Back to top button