नाशिक : शिर नसलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले, ग्रामीण पोलिसांनी ‘असा’ लावला छडा | पुढारी

नाशिक : शिर नसलेल्या 'त्या' मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले, ग्रामीण पोलिसांनी 'असा' लावला छडा

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदी पात्रात एका तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.  हा मृतदेह कोणाचा, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर त्या खूनाचा उलगडा झाला असून संबधित युवकाचा खून करणा-या संशयिताचा छडा लावण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

नेमकी घटना काय?

दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास सायखेडा शिवारातील गंगानगर देवी मंदिरा जवळील गोदावरी नदीपात्रात एका 28 ते 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह गोणपाटामध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता.  याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.  हा मृतदेह कोणाचा आहे, त्याचा खून कोणी व का केला आणि मुंडके कोठे गायब करण्यात आले असे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते.  अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छ़डा लावला आहे.

मृतदेहाच्या हातातील रबरी बॅंडमुळे तपासाला दिशा

मयत तरुणाच्या हातात मिळून आलेले पिवळया रंगाचे रबरी बॅन्ड या खूनाचा छडा लावण्यात महत्वाचे ठरले. स्थानिक बाजारात चौकशी केली असता, प्रामुख्याने नाशिक शहर आणि शहरालगतच्या ओझर, पिंपळगाव, आडगाव परीसरात असे बॅन्ड विक्री होत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालवरून त्यास घटनेच्या चार ते पाच दिवस अगोदर मारण्यात आले असल्याचा उघड झाले.  त्यावरून पोलीसांनी तपासाची दिशा निश्चित करून नाशिक शहर व ओझर परीसरात तपास सूरू ठेवला होता. त्यानुसार पोलिसांना शरद वसंत शिंदे, वय ३३, रा. खेरवाडी शिवार, ता. निफाड व आलीम लतीफ शेख, वय २०, रा. खेरवाडी, ता. निफाड, दोघे मूळ रा. मानोली, ता. मानवत, जि. परभणी हे संशयित मिळून आले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे खेरवाडी येथील शेतकरी जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे यांच्या शेतात सालदार म्हणून शेती काम करत होते. यातील जगदीश संगमनेरे यांनी मागील महीन्यात पेठ फाटा, नाशिक शहर परिसरातून हितेश नावाच्या मजूरास शेती कामकाजासाठी खेरवाडी येथे आणले होते. तेव्हापासून हितेश हा सालदार शरद व आलीम यांच्या सोबत शेती काम करत होता. दिनांक ०७/०२/२०२२ रोजी रात्रीच्या सुमारास हितेश व शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून वाद-विवाद झाले, त्यात हितेश याने शरद व आलीम यास नाशिकवरून पोरं घेवून येतो व तूमचा बेत पहातो अशी धमकी दिल्याचा राग मनात धरून आलीम याने हितेशच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. त्यात तो रक्तबंबाळ होवून तो खाली कोसळून मयत झाला.

याच दरम्यान त्यांचे मालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे व जगदीश यांचा मुलगा योगेश संगमनेरे त्याठिकाणी आले. त्यावेळी घडलेला प्रकार पाहून गावात बदनामी होईल तसेच बटाईने करत असलेली शेती जाईल आणि शेती कामास पुन्हा मजूर मिळणार नाही यादृष्टीने मालक जगदीश व संदीप यांच्या सांगण्यावरून सालदार शरद याने बाजूस पडलेल्या कु-हाडीने हितेश याच्या गळ्यावर व मानेवर घाव घालून त्याचे धड व शीर वेगळे केले. त्यानंतर हितेश याचे प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी सर्वांनी मिळून मृतदेह व शीर हे वेगवेगळ्या गोणपटात टाकून, त्यास तारेने बांधून सायखेडा गावातील गोदावरी नदीवरील पुलावरून मृतदेह व शिर असे नदीत फेकून दिले.

यांना घेतले ताब्यात 

याप्रकरणात, शरद वसंत शिंदे, वय ३३, रा. खेरवाडी शिवार, ता. निफाड, आलीम लतीफ शेख, वय २०, रा. खेरवाडी, ता. निफाड, दोघे मूळ रा. मानोली, ता. मानवत, जि. परभणी, जगदीश भास्कर संगमनेरे, वय ५३, संदीप भास्कर संगमनेरे, वय ४५,  योगेश जगदीश संगमनेरे, वय २४, तिघे रा. खेरवाडी- ओझर रोड, शिवांजली नगर, खेरवाडी, ता. निफाड यांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे.

हेही वाचा :

Back to top button