ख्रिस गेल वैतागला; आयपीएल बायो बबल सोडणार | पुढारी

ख्रिस गेल वैतागला; आयपीएल बायो बबल सोडणार

पुढारी ऑनलाईन डेस्क

पंजाब किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल बायो बबलला पुरता वैतागला आहे. त्यामुळेच त्याने आयपीएलचा बायो बबल सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती पंजाब किंग्जने गुरुवारी दिली. ख्रिस गेल आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्रात फक्त दोन सामने खेळला आहे.

वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू कॅरेबियन प्रीमियर लीगच्या बायो बबलमधून थेट दुबईतील बायो बबलमध्ये आले होते. त्यामुळे ख्रिस गेल प्रमाणेच इतर वेस्ट इंडिज खेळाडूंवरही बायो बबलचा मानसिक ताण येत आहे. याबाबत ख्रिस गेल म्हणाला की, ‘गेल्या काही महिन्यांपासून मी बायो बबलमध्ये वावरत आहे. सीपीएल बायो बबलमधून मी थेट आयपीएल बायो बबलमध्ये प्रवेश केला होता. आता मला मानसिकदृष्ट्या ताजेतवाणे व्हायचं आहे.’

गेल पुढे म्हणाला, ‘आता मला टी२० वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजला मदत करायची आहे. त्यामुळे मी दुबईत ब्रेक घेणार आहे. पंजाब किंग्जने मला यासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या सदिच्छा त्यांच्याबरोबर आहेत. त्यांना येणाऱ्या सामन्यांसाठी शुभेच्छा.’

प्रशिक्षक कुंबळेचा गेलच्या निर्णयाला पाठिंबा

ख्रिस गेलच्या या निर्णयावर पंजाब किंग्जचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने संघ त्याच्या निर्णयाचा आदर करते अशी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘मी ख्रिस गेल विरुद्ध खेळला आहे आणि पंजाब किंग्जमध्ये प्रशिक्षणही दिले आहे. या सर्व वर्षांमध्ये मला तो अत्यंत व्यावसायिक असल्याचे उमगले. आम्ही संघ म्हणून त्याच्या निर्णयाचा आणि टी२० वर्ल्डकपसाठी तयारी करण्याच्या इच्छेचा आदर करतो.’

पंजाब किंग्जचे सीईओ सतिश मेनन यांनी, ‘ख्रिस हा महान खेळाडू आहे. त्याने टी२० क्रिकेटचा नूरच बदलला. आमचा त्याच्या निर्णयाला पाठिंबा आहे. तो पंजाब किंग्ज परिवाराचा एक भाग आहे. त्याची अनुपस्थिती कायम जाणवेल. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देतो आणि त्याच्या यशाची कामना करतो.’ अशी प्रतिक्रिया दिली.

ख्रिस गेलने सध्यातरी दुबईमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तो काही काळानंतर टी२० वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघात सामिल होईल.

हेही वाचले का?

Back to top button