नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात | पुढारी

नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता. नंदुरबार येथे नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी उच्च अधिकारी असल्याचा कुठलाही अहंकार न ठेवता त्या क्षणभरातच चिमुकल्यांच्या विश्वात हरवून गेल्या. जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर बसून त्यांनी दिलखुलास विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

एरवी कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेल्यावर संस्थाचालक आणि शिक्षक यांच्या मनावर ताण निर्माण होतो. भेटीला आलेल्या अधिकाऱ्यांच्या थाटातील वर्तन मुलांनाही दडपण आणणारे असते. परंतु प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल यांनी स्नेहीभेट देत सर्वप्रथम वर्गात प्रवेश केला. विद्यार्थ्यांना सहजपणे सामोरे जात त्यांना बोलते करत प्रेमळ संवाद साधला. मुला मुलींच्या गोंधळलेल्या अवस्थेतून बालसुलभपणातून कधी चाणाक्षपणातून येणाऱ्या उत्तरांमधील गम्मत जम्मत अनुभवताना काही वेळ त्या हरवून गेल्या.

प्रकल्पाधिकारी आणि मुलांमध्ये असा घडला मुक्तसंवाद… 

मॅडम – “आज मोर्चा होता तुम्हाला माहित आहे का?”

“हो.”.. प्रश्न न कळल्यामुळे इयत्ता तिसरीतील चिमुकलीचे घाईघाईने उत्तर.
तिच्या बाळबोध उत्तराला मॅडम हसून दाद देतात.

मॅडम – “बेरजेचे उदाहरण कोण पटकन सोडवितो?”

नारायणचा हात उंचावतो.. मॅडम त्याच्याकडे वही देतात.. आणि नारायण प्रचंड एकाग्रतेने उत्तर सोडवितो.

“अरे ..वा !”
नारायणचे बरोबर उत्तर बघून प्रकल्प अधिकारी खुश होतात.

“कोणा कोणाला माझ्यासोबत सेल्फी काढायची आहे?”

कदाचित सेल्फी या शब्दाचा अर्थ न समजल्यामुळे घाबरलेले चेहरे हात उंचावण्यास धजावत नाहीत.. अशातच काही थोड्याशा धीट चेहऱ्यांना मॅडम बरोबर हेरतात.. त्यांना जवळ बोलावून आपल्यासोबत सेल्फी काढतात.

अर्णव, नारायण आणि प्रेम यांना कार्यालयात यायचे आमंत्रण देऊन वर्गाचा निरोप घेतात.

वाऱ्याच्या वेगाने पुढच्या वर्गात प्रवेश…
प्रश्नउत्तराने संवाद … मनासारखी अपेक्षित प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर पूजा या विद्यार्थीनीला टाळी देतात.
वर्गशिक्षक – “मॅडम ही पूजा तुमची वाट बघतच होती..”
“अरे वा पूजा ,सांग बर माझं नाव? ”
“मी..न..ल.. करन..वा ल..” आपले डोळे घट्ट मिटत उघडत पूजा उत्तरली..
चिमुकलीचे बरोबर उत्तर ऐकून मॅडम, मुख्याध्यापक आणि शिक्षक अवाक..!
“तुला माझे नाव कस माहित..?” कुतुहलाने भरलेला प्रश्न.

“आमच्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेले आहे?”
पूजा आता थोडी धीट झाली.
यावेळी प्रचंड आनंद प्रकल्प अधिकारी यांच्या चेहऱ्यावर दिसतो…
त्यामुळे पूजा अधिकारी यांच्या सोबत सेल्फी काढते.
प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थ्यांशी खूप गप्पा करायच्या होत्या, परंतु पुढील बैठकीस उशीर होऊ नये म्हणून त्या निघाल्या..
मॅडम आता आपल्या वर्गात येणार नाही हे बघून बाकीचे चिमुकले शाळेच्या ओट्यावर आले आणि सगळ्यांनी एकच गलका  करत “मॅडम, आमच्या वर्गात पण या ना..! असे निमंत्रण दिले.

वेळेअभावी सर्व वर्गांमध्ये जाऊ शकत नाही.. आणि चिमुकल्यांना नाराज देखील करू शकत नाही.. त्यामुळे हा गुंता त्यांनी समुहाने फोटो काढून सोडवला. अशी माहिती जळखे आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा:

Back to top button