धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार प्रोत्साहनपर रक्कम देणार: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार प्रोत्साहनपर रक्कम देणार: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Published on
Updated on

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (दि.१४) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी १ हजार कोटीच्या निधीस मंजुरी देण्यात आली. यामुळे राज्यातील ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. ही रक्कम २ हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.

२०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धान खरेदी झाली होती. पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. या पूर्वीच्या खरीप हंमागामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे. मात्र ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे. अशाच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले. तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यंदा २०२२-२३ योजनेसाठी सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

• राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार
(शालेय शिक्षण विभाग)

• धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ
(अन्न व नागरी पुरवठा विभाग)

• डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

• महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत (सार्वजनिक आरोग्य विभाग)

• पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार (जलसंपदा विभाग)

• पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा.
जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा.

सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news