नाशिक : बिबट्याची कातडी विकताना तस्कर जेरबंद | पुढारी

नाशिक : बिबट्याची कातडी विकताना तस्कर जेरबंद

देवळा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

बिबट्याची कातडी काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तस्करास देवळा पोलिसांनी ताब्यात घेत बिबट्याची कातडी जप्त केली. ताब्यात घेतलेला आरोपी कळवण तालुक्यातील आहे. येथील सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी वेश पालटत कातडी खरेदीदाराची भूमिका वठवत तस्करास ताब्यात घेतले.

खर्डे व निवाणेबारी परिसरात बिबट्याची तस्करी करणारे काही जण असल्याची माहिती देवळा पोलिसांना मिळाली होती. याची तत्काळ दखल घेत शिरसाठ यांनी तातडीने सूत्रे हलवली. खर्डे येथील पोलिसपाटील भारत जगताप यांना सोबत घेत बिबट्याच्या कातडीची विक्री करणाऱ्यांशी संपर्क साधत त्यांना खरेदीदार असल्याचे भासवले. त्यांनी हा व्यवहार करण्यासाठी निवाणबारी शिवारात एकांतात बोलावले असता शिरसाठ यांनी वेश बदल करत त्यांची भेट घेतली. लाखांच्या पटीत व्यवहार ठरत असताना पोलिस पथकाने कातडी विक्री करणाऱ्याला तेथेच ताब्यात घेतले. जप्त केलेले कातडे दोन ते अडीच वर्षे वयाच्या बिबट्याचे असावा, असा अंदाज आहे. संशयित आरोपी औत्यापाणी (हल्ली मुक्काम आठबे, ता. कळवण) येथील असून, त्यास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे कातडी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलिस हवालदार आर. पी. गवळी, ज्योती गोसावी, सुरेश कोरडे, वाहनचालक श्रावण शिंदे यांनी यशस्वी कारवाई केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

हेही वाचा : 

Back to top button