file photo
file photo

पुणे : गुंड भासवून उकळत होता 14 वर्षांच्या मुलाकडून खंडणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'आताच जेलमधून सुटून बाहेर आलो आहे. मी मोठा गुंड असून, तुला जीव गमवायचा नसल्यास मला 45 हजार रुपये दे, अन्यथा परिणाम वाईट होतील,' अशी धमकी देत 14 वर्षीय मुलाकडून खंडणी उकळणार्‍याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
सागर श्रवण पवार (वय 28, रा. गांधीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सॅलेसबरी पार्क येथे राहणार्‍या एका 38 वर्षांच्या नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ऑक्टोबर 2022 ते फेब—ुवारी 2023 या कालावधीत स्वारगेट परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारील सोसायटीत राहणार्‍या एकाकडे पवार हा चालक म्हणून कामाला आहे. येथे काम करत असताना त्याची फिर्यादी यांच्या 14 वर्षांच्या मुलासोबत ओळख झाली होती. सागरने त्याला 'मी खूप मोठा गुंड आहे. आताच जेलमधून बाहेर आलेलो आहे,' अशी भीती घातली होती.

'तू जर तुमच्या घरातील पैसे गुपचूप आणून नाही दिले, तर तुला पळवून घेऊन जाऊन जिवे ठार मारून टाकेल', अशी सतत धमकी देत होता. त्याला घाबरून फिर्यादी यांच्या मुलाने त्याला घरातील 45 हजार रुपये आणून दिले होते. त्यानंतर 10 फेब्रुवारीला रात्री दहा वाजता फिर्यादीचा मुलगा पार्किंगमध्ये खेळत होता. त्या वेळी पवार याने त्याला पुन्हा धमकी दिली होती.

आजीचा संशय खरा ठरला…
मुलगा घरातून पैसे घेऊन जात असल्याचा संशय या मुलाच्या आजीला आला. तिने ही बाब फिर्यादी यांना सांगितली. त्यांनी मुलाला विचारल्यावर त्याने सागर धमकावून पैसे उकळत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी सागर याला जाब विचारला तेव्हा त्यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी सागर याला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

सागरवर यापूर्वीचा गुन्हा दाखल आहे. तो गुंड असल्याचे सांगून मुलांना धमकावून पैसे काढून घेत असे. परंतु, नातू घरातून वारंवार पैसे घेत असल्याचे आजीच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत आपल्या मुलाला नातवाकडे लक्ष देण्यास सांगितले. या दरम्यान पैसे देणे बंद झाल्याने सागरने मुलाला मारहाण केली. त्यानंतर मुलाच्या वडिलांचे सागरचे वाद झाल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी सागरला अटक करण्यात आली आहे.

              – अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे.

logo
Pudhari News
pudhari.news