नगर : जिल्हा परिषदेत टक्केवारी घेऊन कामे ; खासदार विखे यांचा आरोप | पुढारी

नगर : जिल्हा परिषदेत टक्केवारी घेऊन कामे ; खासदार विखे यांचा आरोप

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यात आगामी काळात 2500 कोटी रुपयांची जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांची कामे सुरू होत आहेत, अशी माहिती भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. मागील तीन वर्षांत जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, बांधकाम व समाजकल्याण समितीच्या सभापतींनी रस्ते, बंधारे एवढेच नव्हे, तर दलित वस्त्यांसाठी आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेऊन कामे केली, असा गंभीर आरोप डॉ. विखे यांनी यावेळी केला. तालुक्यातील देशमुखवाडी येथे एक कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे भूमिपूजन खासदार विखे व आमदार राम शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे अंबादास पिसाळ, अशोकराव खेडकर, दादासाहेब सोनमाळी, बंडा मोढळे, सुनील यादव, तात्यासाहेब माने, सुनील काळे, अंबादास दंडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, उपअभियंता विठ्ठल माने यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण जनतेलास्वच्छ व पुरेसे पाणी मिळण्यासाठी जलजीवन पाणीयोजना सुरू केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलजीवन मिशन पाणीयोजना पंतप्रधानांच्या नावाची असल्यामुळे राज्यात राबविली गेली नाही. वास्तविक या योजनेमुळे ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी मिळणार आहे.

आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना विखे म्हणाले, स्थानिक आमदारांनी तीन वर्षांमध्ये जनतेचे प्रश्न व विकासकामे सोडविण्याऐवजी फक्त त्यांचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला. अनेकांचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला. भाजपला संपवण्यासाठी जे काही जमेल ते सर्व प्रयत्न केले. मात्र, आम्हालाही सत्ता हवी होती. परंतु आम्ही कधीही कार्यकर्ते संपविण्याचे काम केले नाही. कुकडीच्या पाण्यासाठी कर्जत, जामखेड, श्रीगोंदा व पारनेर या तालुक्यांवर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सतत अन्याय केला. मात्र. त्यांना जाब विचारण्याची धमक कोणातही नाही. यामुळे पुढील काळात हा अन्याय आता सहन केला जाणार नाही, असेही विखे यांनी सुनावले.

आमदार शिंदे म्हणाले, कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी परिसरामध्ये रस्ते, शेतीला पाणी, यासह अनेक योजना आपण मंजूर करून आणल्यात् या सर्व पूर्ण केल्या. नारजूत तलावामध्ये मंत्री असताना पाणी सोडले. त्यानंतर कधीही पाणी आले नाही. वीज, पाणी, रस्ते हे प्रश्न निर्माण होऊ दिले नाहीत, विकास केला. विकास हा केवळ राम शिंदे हाच करू शकतो हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. यावेळी मधुकर दंडे पाटील यांनी काही स्थानिक प्रश्न मांडले. सूत्रसंचालन तात्यासाहेब माने यांनी केले, तर आभार बंडा मोढले यांनी मानले.

आमदार थोरात  यांचा समाचार

खासदार विखे यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, तत्कालीन महसूल मंत्री नगर जिल्ह्यातील होते. त्यांनी कधीही कुकडीच्या भूसंपादनाची बैठक घेतली नाही. जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली नाही. त्यांनी कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना भूसंपादनाच्या पैशाबाबत कधीही विचारणा केली नाही, अशा पद्धतीचा कारभार तीन वर्षांमध्ये करण्यात आला, असे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केली.

Back to top button