पतीला ’यकृत’रूपी प्रेमभेट! माने दाम्पत्याचा अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’ | पुढारी

पतीला ’यकृत’रूपी प्रेमभेट! माने दाम्पत्याचा अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेम व्यक्त करण्याचा, प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देण्याचा, प्रेमाच्या आणाभाका घेण्याचा गुलाबी दिवस! प्रमोद माने आणि सारिका माने या जोडप्यानेही सहा वर्षांपूर्वी अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. पतीला यकृतदान करत पत्नीने जीवनदान दिले आणि व्हॅलेंटाईन डे खर्‍या अर्थाने सार्थ ठरवला.

प्रमोद आणि सारिका यांचा 2011 मध्ये विवाह झाला. लग्नानंतर दोन-तीन वर्षांमध्ये प्रमोद यांना पोट दुखणे, पोटात पाणी होणे, भूक न लागणे अशी लक्षणे दिसू लागली आणि त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. तपासण्या केल्यानंतर लिव्हर सिरॉसिसचे निदान झाले. डॉक्टरांनी 2016 मध्ये स्टेंट घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, वर्षभरात पुन्हा त्रास सुरू झाला आणि वाढत राहिला. प्रमोद यांनी डॉ. बिपिन विभुते यांच्याशी संपर्क साधला. यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रत्यारोपणासाठी दाता शोधण्याचे काम सुरू झाले. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडेही नाव नोंदवण्यात आले. मात्र, दाता मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार होती. प्रमोद माने यांचे दीड-दोन महिन्यांत प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. कुटुंबात कोणी यकृत दान करू शकेल, याबाबत डॉक्टरांनी सुचवले असता सारिका माने तातडीने तयार झाल्या. सर्व तपासण्या केल्यावर त्या योग्य दाता असल्याचे निदान झाले. प्रत्यारोपणासाठी बराच खर्च येणार असल्याने पती-पत्नीने मिळून पैशांची जमवाजमव करण्यासाठी धडपड सुरू केली.

प्रमोद माने कार्यरत असलेल्या प्रवीण मसालेवाले कंपनीसह नातेवाईक, मित्रपरिवार, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून मोलाची मदत
झाली आणि 14 फेब्रुवारी 2017 रोजी अर्थात व्हॅलेंटाईन डेलाच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आता दोघेही
पती-पत्नी सामान्य आयुष्य जगत आहेत.

पत्नी योग्य दाता असल्याचे समजल्यावर मनावरचा ताण आणखी वाढला. पत्नीचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, या विचाराने मनात काहूर माजले होते. मात्र, पत्नीसह डॉक्टरांनी मानसिक आधार दिला. प्रत्यारोपणाच्या वेळी माझे वय 30 तर पत्नीचे वय अवघे 26 वर्षे होते. एवढ्या कमी वयात धाडसी निर्णय घेऊन तिने मला नवसंजीवनीच दिली.

                                                      – प्रमोद माने, पती

शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीपर्यंत आम्ही दोघे पैशांची तजवीज करण्यासाठी धडपडत होतो. आम्हाला 12 फेब्रुवारी रोजी अ‍ॅडमिट केले. ऑपरेशन च्या आदल्या दिवशी पहिल्यांदाच भीती वाटली. आपण दोघेही यातून सुखरूप बाहेर पडू की नाही, अशा विचाराने आम्ही अस्वस्थ झालो होतो. रात्री एकमेकांना धीर देत झोपी गेलो. दुस-या दिवशी शस्त्रक्रिया तब्बल 23 तास चालली आणि यशस्वी रित्या पार पडली. डॉ. विभुते यांच्यासह शर्मिला मॅडम, किरण साठे, राधा मॅडम, धनंजय सर या संपूर्ण टीमने खूप सहकार्य केले. यकृतदान केले तरी मला कोणताही त्रास झाला नाही आणि आता आम्ही दोघेही सुखरूप आहोत.
                                                    – सारिका माने, पत्नी

Back to top button