नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
ईईपीसी इंडियाकडून १६ ते १८ मार्च २०२३ दरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनात इंटरनॅशनल इंजिनिअरिंग सोर्सिंग शोमधून उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या ब्रँडिंगची नामी संधी उपलब्ध होणार आहे. आयमा या प्रदर्शनासाठी सहयोगी पार्टनर आहे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असून, नाशिकच्या उद्योजकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रदर्शनाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले.
आयमाने २०१९ मध्ये बी2बी च्या माध्यमातून नाशिकच्या उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्याने उद्योजकांना त्याचा मोठा लाभ झाला. याच धर्तीवर चेन्नई येथे होणाऱ्या ईईपीसी इंडिया तसेच आयमाच्या संयुक्त सहभागाने नाशिक बिझनेस मीट २.० (२०२३) हे जागतिक दर्जाचे हे प्रदर्शन आहे, असे पांचाळ म्हणाले. आयमा रिक्रिएशन सेंटर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासमवेत आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सहसचिव योगिता आहेर, गोविंद झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे आदी होते.
आयमाच्या सहकार्याने होणाऱ्या या प्रदर्शनातून उद्योजकांना कमीत कमी खर्चात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाशिकचे ब्रॅंडिंग राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर व्हावे, हा प्रमुख उद्देश त्यामागचा आहे. ज्या उद्योजकांना प्रदर्शनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयमाशी त्वरित संपर्क करावा, असे आवाहन उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि सुदर्शन डोंगरे यांनी केले. प्रदर्शनाविषयीची सर्व तपशीलवार माहिती आयमा कार्यालयात उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चेन्नई हे ऑटोकम्पोनंट तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे मोठे हब आहे. देशातील ३५ टक्के ऑटो कम्पोनंट, तर ३० टक्के ऑटोमोबाईल इंडस्ट्री येथे आहेत. चेन्नई हे इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर कम्पोनंट्सचे जगातील मोठे निर्यातदार केंद्र आहे. देशभरातील जास्तीत जास्त बँका आणि वित्तीय संस्थांचे मुख्यालय म्हणून चेन्नईकडे बघितले जाते. चेन्नई येथील प्रदर्शनात आयमाचे खास पॅव्हेलियन असणार आहे. नाशकातून २५ उद्योजकांना नाशिकचे ब्रँडिंग करण्याचे तसेच नाशिकच्या उत्पादनांची जगभरात निर्यात वाढविण्याचे दालन यामुळे खुले होणार आहे. प्रदर्शनात ४०० आंतरराष्ट्रीय आणि देशातील १००० खरेदीदार कंपन्यांशी थेट संपर्क साधता येणार असल्याचे सहसचिव गोविंद झा म्हणाले.
याआधी मुंबईत मेक इन नाशिक प्रदर्शन भरविले होते. आता आयमाने चेन्नईत प्रदर्शन भरविण्याचे धाडस केल्यामुळे नाशिकच्या उत्पादनांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :