नगर : केडगावात मेघडंबरीची प्रतिकृती ; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण | पुढारी

नगर : केडगावात मेघडंबरीची प्रतिकृती ; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण

नगर : पुढारी वृत्तसेवा : केडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण काम पूर्ण झाले असून, रायगड किल्ला येथील मेघडंबरीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सुशोभीकरण लोकार्पण सोहळा होणार आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
केडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचे काम 1995 साली झाले होते.

पुतळा परिसरातील सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे, यासाठी केडगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार जगताप यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. त्यांनी तातडीने या कामासाठी 10 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  शिवजयंतीनिमित्त 19 रोजी सायंकाळी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिवभक्त, विविध सामाजिक संघटना व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी महापौर संदीपदादा कोतकर युवा मोर्चाचे अध्यक्ष भूषण गुंड व सूरज कोतकर यांनी केले आहे.

 

Back to top button