Accident : मुंबई-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; दहा ते बारा वाहने एकमेकांवर आदळले | पुढारी

Accident : मुंबई-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; दहा ते बारा वाहने एकमेकांवर आदळले

धायरी : भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वडगाव बुद्रुक येथील पुलाजवळ विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये १० ते १२ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून अहमदाबादकडे कपडे घेऊन निघालेला ट्रक वडगाव बुद्रुक येथील पुलावरून उताराने खाली येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होती. या अपघातात १० ते १२ चारचाकी वाहने एकमेकांवर आदळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मात्र ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचे माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

Back to top button