नाशिक : कारने धडक दिल्याने ‘बाळूमामां’च्या 15 मेंढ्या ठार | पुढारी

नाशिक : कारने धडक दिल्याने ‘बाळूमामां’च्या 15 मेंढ्या ठार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पंचाळे शिवारातील शिंदेवाडी फाट्यावर संत बाळूमामांच्या पालखीतील मेंढ्यांना स्विफ्ट कारने धडक दिल्याने 15 मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.

शनिवारी (दि. 11) सायंकाळी 7 ला मिरगाव येथून शहामार्गे बाळूमामाच्या पालखी क्रमांक 13 मध्ये समावेश असलेल्या 250 मेंढ्या पंचाळे येथे एका भाविकाच्या शेतामध्ये बसण्यासाठी येत होत्या. त्यानिमित्त सायंकाळी 6 ला गावात बाळूमामांच्या पालखीचे आगमन झाले. ग्रामस्थांनी वाजत-गाजत या पालखीचे स्वागत करून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रवाना झाली. शहा येथून मेंढ्या शहा-पंचाळे रस्त्याने प्रवास करत होत्या. त्यावेळी सायंकाळी 7ला शिंदेवाडी फाट्यावर कोळपेवाडीमार्गे येणार्‍या एका स्विफ्ट कारने मेंढ्यांच्या कळपातील ताफ्याला रस्त्याने चालणार्‍या मेंढ्यांना धडक दिली. त्यामध्ये 15 मेंढ्या जागेवरच ठार झाल्या, तर सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. ग्रामस्थांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली.

ग्रामस्थांनी पुकारले आंदोलन..
भाविकांनी या घटनेच्या निषेधार्थ शिंदेवाडी पंचाळे रस्ता वाहतुकीसाठी काही वेळ रोखून धरला होता. याबाबत मुसळगाव एमआयडीसी पोलिसांना खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत भाविकांचे सांत्वन करत गाडीचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. नंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको रद्द केला. पोलिसपाटील शांताराम कोकाटे, पोलिस हवालदार जगताप यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी केली.

हेही वाचा:

Back to top button